ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंड सुपर ८ मध्ये

स्कॉटलंडचा ५ गडी राखून पराभव : हेड, स्टॉयनिसची अर्धशतके

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th June, 11:56 pm
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंड सुपर ८ मध्ये

सेंट लुसिया : टी- २० विश्वचषक २०२४ च्या ३५ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा ५ गडी राखून पराभव केला. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकांत ५ गडी गमावून १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९.४ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. स्कॉटलंडच्या पराभवाचा फायदा इंग्लंडला झाला. इंग्लंड ५ गुणांसह सुपर-८ साठी पात्र ठरले. त्याचा रन रेट स्कॉटलंडपेक्षा जास्त होता. स्कॉटलंडने ब गटात तिसरे स्थान पटकावले.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंड संघाची सुरुवात खुपच खराब झाली. अवघ्या ३ धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. सलामीवीर मायकेल जोन्स केवळ २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर जॉर्ज मुनसे आणि ब्रँडन मॅकमुलेन यांनी डावाची धुरा सांभाळली. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची जबरदस्त भागीदारी केली. मुनसेने २३ चेंडूत ३५ धावा केल्या आणि ब्रेंडन मॅकमुलेनने ३४ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६० धावांची तुफानी खेळी केली.
स्कॉटलंडसाठी टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रमही मॅकमुलेनच्या नावावर आहे. त्याने अवघ्या २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर कर्णधार रिची बेरिंग्टनने ३१ चेंडूत नाबाद ४२ धावा करत स्कॉटलंडला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला लवकरच पहिला धक्का बसला. डेव्हिड वॉर्नर १ धावेवर पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार मिचेल मार्शलाही केवळ ८ धावा करता आल्या. ग्लेन मॅक्सवेललाही केवळ ११ धावा करता आल्या आणि ६० धावांपर्यंत कांगारू संघाने ३ विकेट गमावल्या होत्या.
मात्र, यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी झंझावाती भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन केले. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. ट्रॅव्हिस हेडने ४९ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६८ धावांची खेळी केली. तर मार्कस स्टॉयनिसने २९ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली. यानंतर टीम डेव्हिड आणि मॅथ्यू वेडने संघाला विजयापर्यंत नेले.
स्टॉयनिस सामनावीर
ऑस्ट्रेलियाकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉयनिसने २९ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. स्टॉयनिस आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी झाली. स्टॉयनिसला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
सुटलेला झेल पडला महागात
ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या पाचव्या षटकात मायकेल जोन्सने ट्रॅव्हिस हेडचा झेल सोडला. त्यावेळी तो १७ धावांवर फलंदाजी करत होता. कॅच ड्रॉप संघाला महागात पडला, कारण हेडने मार्कस स्टॉयनिससोबत ८० धावांची भागीदारी केली. त्याचवेळी ४९ चेंडूत ६८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाचा सामना जिंकला.