पाद्रींना नाहक दोष; दक्षिण गोव्याबाबत भाजपला विचारमंथनाची गरज

भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघांत म्हणावी तेवढी मते भाजपला मिळालेली नाहीत. ज्यांना पक्षात आणले त्यांच्याही मतदारसंघांत भाजपची निराशा झाली आहे. त्यामुळे फक्त सासष्टीतील मतांमुळे पाद्रींना दोष देण्यापेक्षा दक्षिण गोव्यातील इतर मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण करूनही आणि पक्षाकडे मोठे केडर असतानाही मोठ्या प्रमाणात मते का मिळाली नाहीत याचा अभ्यास भाजपने करायला हवा. नाराजी फक्त सासष्टीत आहे की संपूर्ण दक्षिण गोव्यात ते लक्षात येईल.

Story: उतारा |
16th June, 05:04 am
पाद्रींना नाहक दोष; दक्षिण गोव्याबाबत भाजपला विचारमंथनाची गरज

दक्षिण गोव्यात भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर गेले काही दिवस वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे विश्लेषण सुरू आहे. भाजपने हा पराभव गांभीर्याने घेतला. ख्रिस्ती धर्मगुरुंनी केलेल्या ध्रुवीकरणामुळे दक्षिणेत भाजपला पराभव पाहावा लागला, अशा निष्कर्षापर्यंत भाजप आला. भाजपच्या अंतर्गत बैठकीत या कारणावर शिक्कामोर्तब झाले. हा विषय जाहीरपणे कसा मांडायचा असा प्रश्न आला. चर्चच्या पाद्रींनी भाजपविरोधात उघडपणे काम केले हे जाहीर होते. मतदानादिवशीच आमदार नीलेश काब्राल यांनीही तसा आरोप केला होता. या निवडणुकीत दक्षिण गोव्यात रिव्हॉल्यूशनरी गोवन्सलाही उघडपणे अनेक ख्रिस्ती कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसला मत देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ख्रिस्ती मतदार असोत किंवा ख्रिस्ती धर्मगुरू. यातील बहुतेकांनी भाजपविरोधात काम केले असण्याची शक्यता आहे. त्यातूनच पाद्रींनी मतांचे ध्रुवीकरण केल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले. भाजप सरकारकडून वारंवार सगळ्या प्रकारचे लाभ घेणारे सासष्टीतील काही राजकारणी तर निवडणुकीच्या काळात मूग गिळून गप्प होते. त्यांनी ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिकी घेतली. त्यांच्या गप्प राहण्याचा फायदा भाजपला होईल असे वाटत होते. चर्चिल आलेमाव, फ्रान्सिस सार्दिन, लुईझिन फालेरो या नेत्यांनीही उघडपणे भूमिका घेतली नव्हती. असे असतानाही सासष्टीतील मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस मतांची आघाडी दिली. सासष्टीतील मतदारांमुळेच कॅप्टन विरियातो जिंकले हे सत्य आहे. भाजपला असा पराभव अपेक्षित नव्हता. सुमारे पंधरा आमदार भाजपसोबत होते. १२ भाजपचे आमदार, एक मगो, दोन अपक्षांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा होता. भाजपला एवढा भक्कम पाठिंबा दक्षिणेत प्रथमच मिळाला होता. असे असतानाही भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांना पराभव पत्करावा लागला. खरे म्हणजे, या पराभवामुळे भाजपनेही फार आक्रमक होण्याची गरज नाही. कारण दक्षिणेत दोन निवडणुका वगळल्या तर कायम भाजपचा पराभवच झाला आहे. त्यात हा एक. यावेळी महिला उमेदवार देऊनही तसेच देशातील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये असलेला उमेदवार असतानाही मतदारांनी भाजपची घोर निराशा झाली. भाजपच्या श्रेष्ठींनी पल्लवी धेंपो यांना उमेदवारी देण्याबाबत जास्त पुढाकार घेतला होता. त्यामुळेच स्थानिक भाजप संकटात सापडला. या पराभवाचे विश्लेषण करताना पहिले लक्ष्य ख्रिस्ती धर्मगुरुंना करण्यात आले. आमदार संकल्प आमोणकर आणि प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनीही पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून पाद्रींचा समाचार घेतला. पाद्रींनी केलेल्या ध्रुवीकरणाचे काही पुरावे म्हणून काही बातम्यांचा दाखलाही दिला. त्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काही धर्मगुरुंनी भाजप विरोधात प्रचार केल्याचा आरोप केला होता. ते धर्मगुरू कोण हे स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे काँग्रेसने ब्रह्मेशानंद स्वामींनाही त्यात ओढले. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला. शेवटी मतांचे ध्रुवीकरण करणारे ब्रह्मेशानंद नव्हे तर ख्रिस्ती धर्मगुरू होते हे सांगण्यासाठी भाजपने संकल्प आमोणकर आणि गिरीराज पै वेर्णेकर यांना पुढे केले. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे ख्रिस्ती धर्मगुरू नाराज झालेच, शिवाय सरकारमधील काही मंत्र्यांनाही ते पटले नाही. धर्मगुरूंना दोष देण्यापेक्षा आपले कार्यकर्ते कमी पडले असा सूर काही मंत्र्यांनी आळवला. एरव्ही राजकीय विरोधक असलेले मॉविन गुदिन्हो आणि सुदिन ढवळीकर यांचे या विषयावर मात्र एकमत झाले. काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि पाद्रींनीही भाजपच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यामुळे शेवटी भाजपने या विषयावर कोणी काही बोलू नये असे निर्देश आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले. एका अर्थाने या विषयावर आता पडदाच टाकण्यात आला आहे.

देशातील राजकारण पाहिले आणि विशेषतः भाजपची कामगिरी पाहिली तर दी हिंदूच्या एका वृत्तानुसार भाजपच्या २१२ खासदारांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यातील ६६ जण पराभूत झाले. म्हणजेच ३७ टक्के पराभूत झाले. भाजपचे एकूण ६२ टक्के उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. ज्यांनी गेल्या दहा वर्षांत पक्ष बदलून भाजपची कास धरली होती, अशा ११० खासदारांपैकी ६८ जण यावेळी पराभूत झाले. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात भाजपला मागच्या निवडणुकीच्या तुलनेत २९ जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळे निवडणुकीत विजय आणि पराजय हा कोणाच्यातरी वाट्याला येणारच आहे. जिथे राममंदिर उभारले त्या अयोध्या नगरीतील जनतेने भाजपला नाकारले. या सगळ्या गोष्टी निवडणुकीत वाट्याला येतात. निवडणुकीनंतर त्याचे भांडवल करायचे नसते किंवा पराभवाचा सूडही घ्यायचा नसतो. निश्चितच आपल्या पराभवाचे विश्लेषण करणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम आहे. कुठे चुका झाल्या? कुठे कमी पडलो? का कमी पडलो? याचा विचार करून चुका सुधारायच्या असतात. आपला पराभव अमक्यामुळे झाला किंवा तमका त्याला जबाबदार आहे असे म्हणण्यापेक्षा पराभवाची कारणे शोधून त्यावर पुढे उपाय शोधण्यावर प्रत्येकाने लक्ष द्यावे. भाजपने गेली कित्येक वर्षे सासष्टी आणि खासकरून ख्रिस्ती मतदारांना खूश करण्यासाठी अनेक उपाय केले. असे असतानाही सासष्टीसारख्या भागात भाजपला मतदार नाकारतात. भाजपला ख्रिस्ती मतदारांनी स्वीकारण्यासाठी ठोस कारणेही असायला हवीत. पाद्रींनी ध्रुवीकरण केलेही असेल. पण भाजपसारख्या बलाढ्य पक्षाने अशा गोष्टींकडे लक्ष देणे कितपत योग्य आहे किंवा लक्ष दिलेच तर त्यावर बोलून दाखवणे योग्य आहे का, याचाही विचार करायला हवा. भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघांत म्हणावी तेवढी मते भाजपला मिळालेली नाहीत. ज्यांना पक्षात आणले त्यांच्याही मतदारसंघांत भाजपची निराशा झाली आहे. त्यामुळे फक्त सासष्टीतील मतांमुळे पाद्रींना दोष देण्यापेक्षा दक्षिण गोव्यातील इतर मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण करूनही आणि पक्षाकडे मोठे केडर असतानाही मोठ्या प्रमाणात मते का मिळाली नाहीत याचा अभ्यास भाजपने करायला हवा. नाराजी फक्त सासष्टीत आहे की संपूर्ण दक्षिण गोव्यात ते लक्षात येईल.


पांडुरंग गांवकर, दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत. मो. ९७६३१०६३००