भाजपला यशाची खात्री, तर ‘इंडी’चा दावा

प्रत्येक राज्यात आम्हाला फायदा होत आहे, तर भाजप कोसळत आहे. त्यामुळे भाजपला जागा कशा मिळतील किंवा पुन्हा सत्तेत कसे येणार, असा सवाल खर्गे यांनी केला आहे. भाजपला केवळ २०० जागापर्यंत मजल मारता येईल असे काँग्रेसला वाटते तर काँग्रेस शतक ओलांडू शकणार नाही, असे भाजप नेते म्हणत आहेत. मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे, हे समजण्यासाठी आणखी अकरा दिवस प्रतीक्षा करावी लागेल.


22nd May, 11:07 pm
भाजपला यशाची खात्री, तर ‘इंडी’चा दावा

लोकसभा निवडणुकीचे २५ मे आणि १ जून असे दोन टप्पे शिल्लक असताना, आपल्यालाच बहुमत मिळेल असे दावे भाजप आणि विरोधकांची इंडी आघाडी करीत असल्याने मतदारांची निकालासंबंधीची उत्सुकता वाढत चालली आहे. निवडणुकीचे सर्व टप्पे संपेपर्यंत कोणताही अंदाज अथवा आकडे प्रसिद्ध अथवा प्रसारित करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. असे सर्वेक्षण आणि आकडे अन्य मतदारांना प्रभावित करतात, हे यामागचे कारण असल्याने असे निर्बंध पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. प्रसार माध्यमे म्हणजे वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांना वाचकांना रोज काही तरी रोचक आणि नवे द्यायचे असल्याने त्यांनी आपला मोर्चा नेत्यांकडे वळवून, मुलाखतींचा सपाटा लावला आहे. केवळ राजकीय विश्लेषकच चर्चा करतात असे नव्हे तर, पंतप्रधानांपासून ते उमेदवारापर्यंत प्रश्नोत्तरे होत असून राजकीय अभ्यासक आणि जागृत मतदार त्याकडे आकर्षित झालेले दिसतात.

काँग्रेसची कामगिरी यावेळी सुधारेल आणि इंडी आघाडीला भरघोस यश मिळेल असा विश्वास त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकताच एका मुलाखतीत व्यक्त केला आहे, तर २०१९ ची स्थिती अल्प प्रमाणात फरक होऊन पुन्हा पुढे येईल, असे मत प्रशांत किशोर या ज्येष्ठ विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. एनडीएच्या जागा काही प्रमाणात वाढून पुन्हा हीच आघाडी सत्तेवर येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. किशोर यांचे विश्लेषण वस्तुस्थितीला धरून असते, त्यामुळे ते काय म्हणतात हे समजून घेणे योग्य वाटते.

सध्याची परिस्थिती सुधारू शकणारा नेता म्हणून राहुल गांधी यांना काँग्रेसप्रणीत भाजप आघाडी सादर करू शकलेली नाही, असे प्रशांत किशोर यांनी मंगळवारी मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान केंद्र सरकारविरोधात व्यापक नाराजी कुठेही दिसत नाही किंवा प्रतिस्पर्ध्याची उणीव आहे, असे त्यांना वाटते. राहुल गांधी आले तर परिस्थिती चांगली होईल, असे चित्र मोजके नेते सोडले तर कुणीही निर्माण करू शकलेला नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड संताप नाही किंवा जो प्रतिस्पर्धी आहे, त्याच्याबद्दल चीड नाही, असे त्यांना वाटते. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करण्यात विरोधी आघाडी अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. इंडी आघाडीकडे विश्वासार्ह चेहरा आणि सत्ताधारी पक्षाविरोधात भक्कम भूमिका नसल्याचे मतदारांना दिसून आल्याने त्याचे विपरित परिणाम जाणवतात, असे त्यांना वाटते आहे.

मतदारांच्या एका वर्गात निराशा आणि अपूर्ण आकांक्षांची व्यथा आहे, गेल्या दशकभरात पंतप्रधान मोदी आणि भाजपची स्थिती कमकुवत करण्याच्या अनेक संधी विरोधकांनी गमावल्या आहेत, २०१५ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा फायदा घेण्यात विरोधक अपयशी ठरले होते, जेव्हा भाजप पराभूत झाला होता. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात एका दशकाहून अधिक काळानंतर मोठा विजय मिळवत विरोधकांनी भाजपला टक्कर देण्याची आणखी एक संधी गमावली, तसेच १९९५ पासून सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरात जवळजवळ गमावले, असेही ते म्हणतात. करोना व्हायरस महामारीनंतर पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत झालेली घसरण आणि २०२० मध्ये पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या निराशाजनक कामगिरीचा फायदा घेण्यात विरोधक अपयशी ठरले. अयोध्येत जानेवारी महिन्यात झालेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर विरोधकांनी अक्षरशः शस्त्रे टाकली, असेही प्रशांत किशोर यांनी नमूद केले. अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी बनवली खरी पण त्यानंतर काही काळ ते निष्क्रिय राहिले. अवघे काही महिने शिल्लक असताना जोर लावला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भाजपने गमावलेले स्थान आधीच परत मिळवले आहे. देशाच्या दक्षिण आणि पूर्व भागात भाजप आपल्या जागा आणि मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ करेल, असे त्यांना वाटते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या इंडी आघाडीच्या तीन पक्षांच्या निवडणुकीची तयारी आणि रणनीती प्रशांत किशोर यांनी काही वर्षापूर्वी केली होती, हे लक्षात घेतले तर त्यांचे मत महत्त्वाचे वाटते.

दुसरीकडे इंडी आघाडीचा महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामते, मागास, अतिमागास आणि दलित बिहारमध्ये इंडी आघाडीला जोरदार पाठिंबा देत आहेत. उत्तर प्रदेशात यावेळी भाजपला फटका बसेल कारण सपा आणि कॉंग्रेस एकत्र प्रचार करत आहेत आणि जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करत आहेत. प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या मेहनतीमुळे विरोधकांना बळ मिळाले आहे. राजस्थानमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सफाया झाला होता, पण यावेळी अनेक जागा मिळतील. मध्य प्रदेशात काँग्रेस २०१९ मधील एका जागेवरून वर जाईल आणि छत्तीसगडमध्ये, हरयाणात चांगले यश मिळत आहे आणि पंजाबमध्ये संख्या कायम ठेवू, असा विश्वास खर्गे व्यक्त करतात. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळेल, असा विश्वासही खर्गे यांनी व्यक्त केला. तेलंगणा, कर्नाटकात काँग्रेसचा फायदा होत आहे. केरळमध्ये आपण जिंकत आहोत, तिथे जो जिंकेल, काँग्रेस असो वा डावे, तो भाजपच्या विरोधात असेल. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये आम्ही चांगली लढत देत आहोत. प्रत्येक राज्यात आम्हाला फायदा होत आहे, तर भाजप कोसळत आहे. त्यामुळे भाजपला जागा कशा मिळतील किंवा पुन्हा सत्तेत कसे येणार, असा सवाल खर्गे यांनी केला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास काँग्रेसला किती जागा मिळवून देतो हे निकालादिवशीच स्पष्ट होईल. 

भाजपला केवळ २०० जागापर्यंत मजल मारता येईल असे काँग्रेसला वाटते तर काँग्रेस शतक ओलांडू शकणार नाही, असे भाजप नेते म्हणत आहेत. मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे, याची आणखी अकरा दिवस प्रतीक्षा करावी लागेल.


गंगाराम केशव म्हांबरे 

(लेखक पत्रकार असून विविध विषयांवर 

लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४