पिसुर्ले-सत्तरीतील घटना... प्रेयसीने फिरवली साक्ष, खुनी हल्ला प्रकरणात प्रियकर निर्दोष

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th April, 01:06 pm
पिसुर्ले-सत्तरीतील घटना... प्रेयसीने फिरवली साक्ष, खुनी हल्ला प्रकरणात प्रियकर निर्दोष

म्हापसा : ‘मियां बीवी राजी तो क्या करेगा काजी’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. असाच प्रकार म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात घडला. प्रियकराचे आणखी एका मुलीशी सूत जुळल्याचे समजल्यानंतर प्रेयसीने तत्काळ ‘ब्रेकअप’ केला. याच रागातून प्रियकराने स्वतःच्या भावाला सोबत घेऊन तिच्यावर खुनी हल्ला केला. प्रकरण न्यायालयात पोहोचले. जवळजवळ अडीच वर्षे न्यायालयात सुनावणी झाली. पण, ऐनवेळी प्रेयसीने साक्ष फिरवली. सरकारी पक्षाला सहकार्यच केले नाही. खटला कोलमडल्याने शेवटी न्यायालयाने प्रियकर आणि त्याच्या भावाला या खटल्यातून निर्दोष मुक्त केले.

म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट यांनी प्रेयसीवरील खुनीहल्ला प्रकरणातून प्रियकर सचिन गावकर (वांते-सत्तरी) आणि त्याचा भाऊ श्रीकांत यांना निर्दोष मुक्त केले आहे.

वाळपई पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, खुनी हल्ल्याची घटना २६ जून २०१९ रोजी घडली होती. त्या दिवशी पिसुर्ले येथील वयले जंक्शनवर सकाळच्या सुमारास हा खुनीहल्ला झाला. पीडितेवर संशयितांनी धारदार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या मान व शरीराच्या इतर भागावर गंभीर जखमा झाल्या होत्या. घटनेच्या दुसर्‍या दिवशी २७ जून २०१९ रोजी वाळपई पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून हल्ल्यासाठी वापरेला कोयता जप्त केला होता.सर्व तपास पूर्ण केल्यानंतर ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पोलिसांनी संशयितांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तरुणीने हल्लेखोरांना न्यायालयात ओळखही पटवली. त्यानंतर १२ मार्च २०२३ रोजी पोलिसांनी सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. पीडित तरुणीला न्याय मिळावा, यासाठी सरकारी वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केले. पण, ऐनवेळी पीडित तरुणीने साक्ष फिरवल्याने सरकारी वकील आणि पोलीसही हतबल ठरले.

मी २६ जून २०१९ रोजी तक्रार केलीच नव्हती, २६ जून २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती, असे सांगून तिने जबाब फिरवला. त्यानंतर तिला तिच्या तक्रारीत कोणतेही तथ्य सांगायचे नव्हते. तिला खटला पुढे चालवायचा नव्हता. शेवटी, पीडितेच्या सहकार्याअभावी हा खटला कोलमडल्याचा निष्कर्ष नोंदवत न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींची भा. दं. सं.च्या ३४१, २३२, ३२४, ३०७ व ३४ कलमाखालील फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

काय होते मूळ प्रकरण?

पोलिसांतील तक्रारीनुसार, गोमेकॉत काम करणाऱ्या तरुणीचे सचिन गावकर (वांते-सत्तरी) याच्याशी प्रेमसंबंध होते. पण, अचानक कहानीत ट्विस्ट आला. प्रियकराचे आणखी एका मुलीशी सूत जुळल्याची माहिती पीडितेला मिळाली. यामुळे नाराज होऊन तिने प्रियकराशी ब्रेकअप केला. दोन महिन्यांनंतर प्रियकराने भावाला सोबत घेऊन प्रेयसीवर हल्ला केला होता. ती तरुणी गोमेकॉत रात्रीची ड्यूटी संपल्यानंतर सकाळी दुचाकीवरून घरी जात होती. त्याचवेळी तिच्यावर हा हल्ला झाला होता. यात प्रेयसी जखमी झाली होती. त्याच दिवशी पोलिसांनी दोन्ही संशयितांना पकडले होते. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी हल्ल्यात वापरलेले कोयता जप्त केला होता. आता या आरोपांतून प्रियकर आणि त्याचा भाऊ निर्दोष मुक्त झाले आहेत.

हेही वाचा