आचारसंहिता लागू झाल्यापासून गोव्यात १६.६५ कोटींचा मुद्देमाल जप्त!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th April, 04:43 pm
आचारसंहिता लागू झाल्यापासून गोव्यात १६.६५ कोटींचा मुद्देमाल जप्त!

पणजी : गोव्यात १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून २२ एप्रिल या महिनाभराच्या कालावधीत विविध तपास यंत्रणांनी तब्बल  १६ कोटी ६५ लाख ५२ हजार ५७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रोकड, ड्रग्ज, दारू, सोने-चांदी यांसारखे मौल्यवान धातू तसेच अन्य मोफत वाटण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचा समावेश आहे.

१६ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान राज्यातील विविध खात्यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये रेल्वे पोलीस, एनसीबी, सीमा शुल्क, अबकारी खाते, पोलीस खाते, आयकर आणि व्यावसायिक कर विभाग यांचा समावेश आहे. यामध्ये आयकर विभागाने ४.६ कोटींची रोख रक्कम आणि ३.०३ कोटी रुपयांचे मौल्यवान धातू जप्त केले आहेत. अबकारी खात्याने ३.४३ कोटी किमतीचे ६२ हजार ९४९ लीटर मद्य जप्त केले आहे.

या शिवाय पोलीस खात्याने २.४६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ, ७४ लाख रुपयांचे ३० हजार ५४६ लीटर मद्य, सुमारे ९ लाखांची रोकड जप्त केली आहे. व्यावसायिक कर विभागाने १.३५ कोटी रुपयांच्या मोफत तसेच अन्य वस्तू जप्त केल्या आहेत.

हेही वाचा