पतीशी भांडण, महिलेने मुलाला फेकले मगरींनी भरलेल्या नदीत! दिव्यांग मुलाचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th May, 12:17 pm
पतीशी भांडण, महिलेने मुलाला फेकले मगरींनी भरलेल्या नदीत! दिव्यांग मुलाचा मृत्यू

उत्तर कन्नड (कर्नाटक) : मानवतेला काळीमा फासणारी घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. येथे एका २६ वर्षीय महिलेने पतीशी भांडण झाल्यानंतर स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलाला चक्क मगरींचा कळप असलेल्या नदीत फेकून दिले. त्यानंतर मुलाला मगरींनी अक्षरशः फाडून टाकले. या भयंकर घटनेत त्या निष्पाप मुलाचा अत्यंत करुणाजनक अंत झाला. हा प्रकार कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यात घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती-पत्नीला अटक केली आहे.

सावित्री (२६) आणि रवी कुमार (२७) या जोडप्याला दोन मुले झाली. लग्नानंतर पहिला मुलगा झाला. पण, त्याला जन्मापासून बोलता येत नव्हते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत. भांडण शिगेला पोहोचल्यावर ‘अशा मुलाला जन्म का दिलास? त्याला फेकून दे’, असे पती तिला सांगत होता. गेल्या शनिवारी याच मुद्द्यावरून सावित्रीचे पतीसोबत पुन्हा भांडण झाले. त्यामुळे तिने संतापून आपल्या मोठ्या मुलाला मगरींनी भरलेल्या नदीत फेकून दिले. हा प्रकार शेजाऱ्यांना समजताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत उशीर झाला होता.

पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मुलाला वाचवण्यासाठी शोधमोहीम सुरू केली, मात्र, अंधारामुळे पोलिसांना तो सापडला नाही. रविवारी सकाळी मुलाचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या अंगावर गंभीर जखमा होत्या. मगरींनी त्याचे लचके तोडल्याचे दिसून आले. त्याचा एक हात गायब होता. त्याचा मृतदेह पाहून पोलीस आणि लोकांच्या अंगावर काटा आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा