सोशल मीडियावर लाइक्स मिळवण्यासाठी उत्तराखंडात त्रिकुटाने पेटवले जंगल!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th May, 10:34 am
सोशल मीडियावर लाइक्स मिळवण्यासाठी उत्तराखंडात त्रिकुटाने पेटवले जंगल!

डेहराडून : उत्तराखंडच्या चमोली जिल्हा पोलिसांनी डेहराडूनपासून २६० किमी अंतरावर असलेल्या गैरसैन भागातील जंगलात आग लावल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. या आरोपींनी कथितरित्या जंगलातील आगीच्या घटनेचा व्हीडिओ बनवला होता आणि सोशल मीडियावर अधिक लाइक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी तो सोशल मीडियावर अपलोड केला होता, असे तपासात आढळून आले आहे.

ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या व्हीडिओची स्वतःहून दखल घेत पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी या तीन आरोपींना अटक केली. ब्रजेश कुंवर, सुखलाल आणि सलमान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते बिहारचे रहिवासी आहेत.

चमोलीचे पोलीस अधीक्षक सर्वेश पनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हीडिओच्या आधारे, पोलिसांनी गैरसैन पोलीस स्थानकाच्या अंतर्गत पांडुखल गावातून तीन आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. तिन्ही आरोपी मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. ते गैरसैनमध्ये मजूर म्हणून काम करतात. चौकशीदरम्यान, तिन्ही आरोपींनी अचंबित करणारा जबाब दिला.सोशल मीडियावर लोकप्रियता वाढवण्यासाठी अधिक लाईक्स आणि फॉलोअर्स मिळण्यासाठी त्यांनी येथे एके ठिकाणी जंगलाला आग लावल्याची कबुली तिघांनी दिली.

या तिघांवर वन कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी जनतेला अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर रहावे. जंगलात आग लावणे किंवा प्रोत्साहन देणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणीही दोषी आढळल्यास कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा