दिल्लीनंतर आता गुजरातमधील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th May, 12:33 pm
दिल्लीनंतर आता गुजरातमधील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

अहमदाबाद : विदेशातून ई-मेलद्वारे दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस इंटरपोलच्या मदतीने त्याचा शोध घेत आहेत. इतक्यात गुजरातमधील अहमदाबादमध्ये असाच ईमल आल्याने खळबळ माजली आहे.

अहमदाबादमधील आठ शाळांना ईमेल मिळाले असून, त्यामध्ये त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा मेल रशियन हँडलरकडून आल्याचे सांगण्यात येत आहे. या ईमेलनंतर पोलीस सतर्क झाले असून शाळांमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे.

सध्या तरी पोलीस पथकाला कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडलेली नाही. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. अहमदाबाद प्रशासनाने पालकांना घाबरू नका असे आवाहन केले असून धोक्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी हजर आहे.

याच धर्तीवर दिल्लीतील शाळांनाही बॉम्बच्या धमक्या देणारे ईमेल आले होते. दिल्लीतील दोनशेहून अधिक शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती. मात्र, नंतर हे बनावट असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी एफआयआरही नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले होते की बॉम्बशी संबंधित ईमेल पाठवण्याचा उद्देश ‘सामान्य दहशत निर्माण करणे आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे’, हा होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा