म्हापसा मुख्याधिकाऱ्यांकडून पालिकेचा कारभार प्रशासकाप्रमाणे

पालिका मंडळाच्या निर्णयाविना जीएसटी, टीसीएस सोपो, पे पार्किंग करांत वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th April, 12:20 am
म्हापसा मुख्याधिकाऱ्यांकडून पालिकेचा कारभार प्रशासकाप्रमाणे

म्हापसा : येथील टॅक्सी स्टॅण्ड व मार्केटमधील पे पार्किंगच्या शुल्कासह पालिका अधिकाऱ्यांनी मार्केटच्या सोपो करातही भरमाट वाढ केली आहे. ही वाढ करतानाच विक्रेत्यांना कचरा करासमवेत जीएसटी व टीसीएस करही लागू केला आहे. पालिका मंडळाच्या ठरावाविना पालिका मुख्याधिकाऱ्यांनी शुल्क वाढ आणि जीएसटी व टीसीएस कर लागू केला असून निवडणूक आचारसंहितेचा लाभ घेत पालिका मंडळ आणि आमदारांना अंधारात ठेऊन मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर हे एकाद्या प्रशासकांप्रमाणे म्हापसा पालिकेचा कारभार बेकायदेशीरपणे हाताळीत आहेत. याची दखल नगरविकास खात्याने घ्यावी, अशी मागणी सत्ताधारी गटातील नगरसेवकांची आहे.
गेल्या ३० जून २०२३ रोजी तत्कालिन नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत मार्केट व टॅक्सी स्थानकावरील पे-पार्किंग शुल्कात वाढ करण्यात आली होती. त्यानुसार दुचाकीसाठी दोन तासांसाठी १० रुपये, तर चारचाकीला दोन तासाला २० रुपये असा हा दर निश्चित केला होती. पुर्वी हा दर ५ व १० रूपये होता. तसेच पे-पार्किंगची निविदा १ कोटी रुपये काढण्याचा निर्णयही झाला होता.
तत्पूर्वी गेल्या ६ एप्रिल २०२३ रोजी पालिका मंडळाच्या बैठकीत मार्केट सोपो करासाठी दर निश्चित केला होता. शेडमधील विक्रेत्यांना प्रति चौरस मीटर ४० रुपये, तर शेड बाहेरील विक्रेत्यांना २५ रुपये प्रति चौरस मीटर दर असेल. यात पाच रूपये कचरा कराचाही समावेश असेल, असा ठराव घेत सोपो कंत्राटची बोली निविदा २ कोटी ४२ लाख २४ हजार रुपये काढण्याचा निर्णय घेतला होता.
पण, या निविदांना कुणीही बोलीदार सापडला नाही. त्यामुळे ३० जून २०२३ रोजी झालेल्या पालिका मंडळामया बैठकीत सुधारित ठरावानुसार मार्केट सोपोची बोली २.४० कोटीवरून १. ८६ कोटी रुपये तर पे पार्किंगची बोली ८० लाखांवरून ७२ लाख रुपये करण्यात आली होती. तसेच शेड बाहेर २० रुपये व शेडमधील ३० रुपये असा नवीन सोपो दर ठरला. हा दर पूर्वी २५ रुपये व ४० रुपये होता.
त्यानंतरही बोलीदार न सापडल्यामुळे गेल्या ६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या पालिका मंडळामया बैठकीत अजून सोपो करात १० टक्के कपात करण्यात आली. १.८६ कोटीवरून १.६७ कोटी रुपयांची नवीन निविदा काढण्याचा ठराव घेण्यात आला होता. तरीही कुणी बोलीदार पालिकेकडे फिरकला नाही. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात पालिकेने स्वत:च्या कर्मचाऱ्यांमार्फतच सोपो कराची वसूली केली.
गेल्या वर्षी प्रमाणेही यंदाही पालिकेकडून सोपा व पे पार्किंगची निविदा जारी करण्यास वेळकाढूपणा केला. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. तसेच सोपो कर शुल्क आणि पे पार्किंग दरात वाढ किंवा या करामध्ये जीएसटी किंवा टीसीएस कर लागू करण्याचा ठराव अद्याप पालिका मंडळाने घेतलेला नाही.
पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी निवडणूक आचार संहितेचा आधार घेत आणि पालिका मंडळाला अंधारात ठेऊन परस्पररित्या सोपो व पे पार्किंग करात भरसमाट वाढ करतानाच त्यात जीएसटी व टीसीएस कराचा त्यात समावेश केला आहे.
पालिका मंडळाने मार्केटमधील सोपो तसेच टॅक्सी स्टॅण्डसह अधिसूचित केलेल्या पे पार्किंग ठिकाणांचा दर वरील ठरावाद्वारे निश्चित केला होता. विक्रेत्यांकडून सोपो कर हा कचरा करासह शेडमधील ३० व शेड बाहेरील २० असा ठरला होता. तर टॅक्सी स्थानकासह मार्केट व पालिका क्षेत्रातील इतर अधिसूचित पे पार्किंग स्थळांचा दर दूचाकींसाठी १० तर चार चाकीसाठी २० रूपये होता.
मुख्याधिकाऱ्यांनी आदेश जारी करत सोपो व पे पार्किंग शुल्कात १८ टक्के जीएसटी व २ टक्के टीसीएससह परस्पररित्या वाढ केली. या दरानुसार शेडमधील विक्रेत्यांना प्रति चौरस मीटर ३५ रूपये तर शेड बाहेरील २५ रूपये, शिवाय कचरा कर ५ रूपये आणि त्यात १८ टक्के जीएसटी व २ टक्के टीसीएस लागू केली जात आहे. त्यानुसार शेड मधील विक्रेत्यांकडून प्रति चौरस मी. ५० रूपये तर शेड बाहेरील ४० रूपये सोपो वसूल केला जातो. तर पे पार्किंगमध्ये टॅक्सी स्टॅण्डवरील शुल्क ५० रूपये व १८ टक्के जीएसटी व २ टक्के टीसीएस मिळून ६० रूपये. तर मार्केट परिसरातील इतर जागी दुचाकीसाठी १० रूपये आणि वरील करासह १२ रूपये तर चार चाकींसाठी २० रूपये व वरील कर मिळून २४ रूपये शुल्क वसूल केले जात आहे.       

बाजारपेठेतील सोपो किंवा पे पार्किंग शुल्क वाढ किंवा जीएसटी व टीसीएस कर लागू करण्यासंदर्भात पालिका मंडळाने ठराव घेतलेला नाही. या वाढीव दराबाबत आम्हाला विश्वासात घेण्यात आलेले नाही. सरकारकडून आदेश आला असल्यास त्यावर निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर चर्चा करणे अपेक्षित होते. याचे स्पष्टीकरण पालिकेच्या लेखा विभागाला पालिका मंडळाला द्यावे लागेल.

डॉ. नूतन बिचोलकर, नगराध्यक्ष                   

हेही वाचा