दक्षिणेत आरजीच्या रुबर्ट परेरा यांनी भरला उमेदवारी अर्ज

इंडि आघाडी गोमंतकीयांच्या हितासाठी नाही : आमदार बोरकर

Story: प्रतिनिधी| गोवन वार्ता |
18th April, 03:48 pm
दक्षिणेत आरजीच्या रुबर्ट परेरा यांनी भरला उमेदवारी अर्ज

मडगाव : तीन अटी घालून इंडिया आघाडीला चर्चेला येण्याचे आवाहन आरजीपीने केले होते. पोगो बिल, परप्रांतीयांच्या झोपडपट्टी हटवणे व म्हादई वाचवण्यासाठी एकत्र येणे या अटी गोवा टिकवण्यासाठी होत्या. सरकारी जमिनी, कोमुनिदादच्या जमिनी हडप झालेल्या आहेत. मात्र, कॉंग्रेस व त्याच्यासोबतच्या घटकपक्षांना यांना गोव्याचे काहीच पडलेले नाही., त्यामुळेच त्यांनी चर्चेला नकार दिला, असे मत आमदार विरेश बोरकर यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यातून रिव्होल्युशनरी गोवन्सच्या  उमेदवारी अर्ज दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्‍विन चंद्रू ए. यांच्याकडे सादर केलेला आहे. यावेळी आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांनी गोमंतकीयांचा आवाज संसदेत पोहोचावा या उद्देशाने राज्यातील लोकसभा निवडणुका लढण्याचा निर्णय आरजीपीकडून घेण्यात आलेला असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील लोकांच्या समस्या संसदेत मांडण्यात राष्ट्रीय पक्ष अपयशी ठरलेले असून अजूनही नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. एसटी आरक्षण, म्हादई, कोळसा वाहतूक, बेरोजगारी, जमिनी राखण्याचा प्रश्‍न अजून कायम आहेत. इतकी वर्षे कमळ व हात यांच्या मध्ये लोकांची घुसमट झालेली आहे. या घुसमटीला नवा पर्याय मिळावा यासाठी आरजीपी पुढे सरसावली आहे, असे मनोज परब म्हणाले.

लोकांना काय पाहिजे हे आरजीपीच्या उमेदवारांनी लोकांकडून जाणून घेतलेले आहे. आरजीपीने घरोघरी फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. खेड्यापाड्यातही आरजीपी फिरत आहे. पाणी, वीज, रस्ता, कोळसा वाहतूक, म्हादई नदी, मरिना असे विविध विषय लोकांना सतावत आहेत. गोमंतकीयांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आरजीपी काम करत आहे. अनेक ठिकाणी बेकायदा झोपडपट्टी निर्माण झालेल्या आहेत. संविधानाने जे हक्क दिलेले आहेत, त्यानुसार आरजीपी गोव्याच्या अस्तित्वासाठी लढत आहे, असे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले. म्हादई नदीचा प्रवाह कायम राखणे, एसटी आरक्षणासाठी लढा देणे, युवकांना केंद्रीय नोकर्‍या मिळाव्यात यासाठी काम करणार व हेच मुद्दे घेउन लोकांकडे पोहोचलेलो असल्याचे उमेदवार रुबर्ट परेरा यांनी सांगितले.

भाजपकडून महिलेला उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येते व सारखेसारखे नारीशक्तीचा गजर करतात. पण जो उमेदवार दिला त्याची संपत्ती पाहता तिला आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचे दिसत नाही. सर्वसामान्य महिलेला उमेदवारी दिली असती तर समजू शकलो असतो असे रुबर्ट परेरा यांनी सांगितले.

दक्षिणेतून कालिदास वायंगणकर यांचाही अर्ज सादर

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून सांकवाळ कुठ्ठाळी येथील सामाजिक कार्यकर्ते कालिदास वायंगणकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्‍विन चंद्रू यांच्याकडे सादर केलेला आहे. याआधी कॉंग्रेस उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस, भाजप उमेदवार पल्लवी धेंपो व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ऍलेक्सी फर्नांडिस यांनी अर्ज सादर केलेले आहेत.

हेही वाचा