सासष्टीत चोरट्यांकडून पुन्हा घरफोडी

कुंकळ्ळी परिसरातून साडेआठ लाखांचा मुद्देमाल लंपास

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
18th April, 02:07 pm
सासष्टीत चोरट्यांकडून पुन्हा घरफोडी

मडगाव : बाळ्ळी येथील चोरीनंतर चोरट्यांनी पुन्हा एकदा कुंकळ्ळी परिसरातील घराला लक्ष्य केलेले आहे. केगदीकट्टो कुंकळ्ळीतील ओपेंद्र पावल यांच्या घरातून साडेआठ लाखांचा मुद्देमाल चोरी करण्यात आलेला आहे. कुंकळ्ळी पोलिसांकडून याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे.

 दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसते. बेताळभाटी परिसरात भरदिवसा घर फोडण्याचा  प्रयत्न या रविवारी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये कैद झाला. त्याचदिवशी रात्री बाळ्ळी येथील घरातून छपराची कौले काढून घरात कुटुंबीय झोपलेले असतानाही साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी केला.

आता बुधवारी रात्री पुन्हा एकदा कुंकळ्ळी परिसरार अज्ञात चोरांनी कोगदीकट्टो येथील ओपेंद्र चंद्रलाल पावल यांच्या घरात चोरी करण्यात आली. चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. पाऊल हे भाड्याच्या घरात राहत असून चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यांनतर सोनसाखळीसह इतर सोन्याचे दागिने व दोन लाख रुपये रक्कम असलेला बॉक्स चोरुन नेलेला आहे. 

शुक्रवारी सकाळी घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर श्वानपथकाला तसेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण करत तपास करण्यात आला. कुंकळ्ळी पोलिसांकडून या चोरीप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा