वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांची भाजपमध्ये घरवापसी


02nd April 2024, 03:53 pm
वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांची भाजपमध्ये घरवापसी

पणजी : वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये घरवापसी केली आहे. प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज पणजीतील मुख्य कार्यालयात त्यांना रितसर प्रवेश दिला. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, वास्कोचे आमदार दाजी साळकर उपस्थित होते.

कार्लुस यांना २०२२ साली विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने ते भाजपमधून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. पण, भाजपचे उमेदवार दाजी साळकर यांनी त्यांचा पराभव केला होता. तेव्हापासून ते काँग्रेसमध्येच होते. त्यांनी आज समर्थकांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. या समर्थकांमध्ये मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक ओपी फ्रेड्रिक्स रॉड्रिग्स, यतीन कामुलकर, श्रद्धा महाले शेट्ये, नारायण बोरकर, सुशीला बोरकर, दाम्पाल स्वामी, माथायास मोन्तेरो आणि इतरांचा समावेश आहे.

मुरगाव पालिका दाबोळी, वास्को आणि मुरगाव या तीन मतदारसंघ येते. कार्लुस आणि त्यांचे नगरसेवक आता भाजपमध्ये आल्याने लोकसभा निवडणुकीत तिन्ही मतदारसंघात भाजपचे वजन आणखी वाढले आहे. दक्षिणेच्या उमेदवार पल्लवी श्रीनीवास धेंपे यांना विजयी करण्यासाठी कार्लुस यांचे समर्थक प्रयत्नशील राहणार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यावेळी म्हणाले.

कार्लुस काँग्रेसमध्ये गेले होते. पण, त्यांचा नेहमीच भाजपशी सलोख्याचे संबंध होते. भाजप सत्तेत नव्हती, तेव्हापासून कार्लुस पक्षासोबत होते. वास्कोत पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी बरेच योगदान दिले होते. आता ते परत पक्षात आल्याने भाजपला आपले हक्काचे घर वास्कोत मिळाले आहे, असेही तानावडे यावेळी म्हणाले.