दिल्लीतील मद्य घोटाळा; गोव्यातील चौघांना ‘ईडी’चे समन्स

आप निमंत्रक अमित पालेकर यांच्यासह भंडारी समाजाच्या अध्यक्षांचाही समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 10:53 am
दिल्लीतील मद्य घोटाळा; गोव्यातील चौघांना ‘ईडी’चे समन्स

पणजी : दिल्लीतील मद्य घोटाळ्यातील सुमारे ४५ कोटी रुपये आम आदमी पक्षाने (आप) गोवा विधानसभा निवडणुकीत वापरले होते, असा दावा केल्यानंतर ‘ईडी’ने आपचे गोव्यातील नेते अमित पालेकर, रामराव वाघ यांच्यासह अखिल गोवा भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक आणि भंडारी समाजाचे नेते दत्तप्रसाद नाईक यांना समन्स जारी केले आहेत. या चौघांनाही चौकशीसाठी गुरुवारी ‘ईडी’च्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात ‘ईडी’ने दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांवरही कारवाई करण्याची प्रक्रिया ‘ईडी’ने सुरू केली आहे. या घोटाळ्यातून जो पैसा मिळाला, त्यातील सुमारे ४५ कोटी रुपये आपने गोव्याच्या गत विधानसभा निवडणुकीत खर्च केल्याचा संशय व्यक्त करीत ‘ईडी’ने आपचे गोवा निमंत्रक अमित पालेकर, पदाधिकारी रामराव वाघ यांच्यासह भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक आणि दत्तप्रसाद नाईक या चौघांना समन्स बजावत गुरुवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स जारी केले आहेत. ‘ईडी’च्या निर्देशानुसार आपण गुरुवारी चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती पालेकर यांनी बुधवारी रात्री उशिरा सोशल मीडियाद्वारे दिली.

दरम्यान, दिल्लीतील मद्य घोटाळ्याचा संबंध गोव्यातील विधानसभा निवडणुकीशी जोडण्यात आल्यानंतर राज्यभर त्याबाबत चर्चा सुरू झाली होती. आता या प्रकरणात ‘ईडी’ने गोव्यातील आपशी संबंधित चौघांना समन्स जारी केल्यामुळे गुरुवारी काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

हेही वाचा