राज्यातील सहकारी संस्थांनी कृषी विकासावर भर द्यावा !

सहकार मंत्री सुभाष शिरोडकर : राज्य सहकार पुरस्कारांचे वितरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th February, 12:16 am
राज्यातील सहकारी संस्थांनी कृषी विकासावर भर द्यावा !

फोटो : सहकार पुरस्कार विजेत्यांसह सहकार मंत्री सुभाष शिरोडकर सोबत इतर.

पणजी : राज्यातील सहकार क्षेत्र वाढवायचे असेल तर सहकारी संस्थांनी अधिक बांधिलकीने आणि समर्पित वृत्तीने काम करणे आवश्यक असल्याचा सल्ला सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला. बुधवारी पणजीत राज्य सहकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सहकार निबंधक अरविंद बुगडे, राज्य सहकारी बँकेचे उल्हास फळदेसाई, अरुण भट व अन्य अधिकारी उपस्थित होते.
शिरोडकर म्हणाले, सहकारी संस्थांचा गेल्या आर्थिक वर्षाचा आढावा ‘कभी खुशी कभी गम’ अशा स्वरूपाचा आहे. काही चांगली कामे झाली आहेत. मात्र, अजून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. सहकारी संस्थांनी आपले ऑडिट वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ऑडिट झाले नसेल तर मी मुख्यमंत्र्यांना किंवा सामान्य जनतेला उत्तर देऊ शकणार नाही.
ते म्हणाले, सहकार क्षेत्रात मोठे बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही विविध उपक्रम राबविणार आहोत. पुढील दोन ते तीन महिन्यांत सर्व सहकारी संस्थांनी त्यांचा डेटा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करणे बंधनारक होणार आहे. याशिवाय खात्यातर्फे सहकारी संस्थांसोबत दर सोमवारी बैठक घेण्यात येईल. सहकारी संस्थांनी केवळ एकाच क्षेत्राला महत्त्व न देता पर्यटन, समुद्राशी निगडित ब्ल्यू इकॉनॉमीकडेही लक्ष दिले पाहिजे.

गोव्यात या क्षेत्रात काम करण्यास खूप वाव आहे. आता तरुणांना पुढाकार घेणे आवश्यक आहे. गोव्यातील सहकारी बँका तंत्रज्ञानात मागे पडत आहेत. यामुळेच खासगी बँका पुढे जात आहेत. यासाठी सर्व सहकारी संस्थानी, सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. _ प्रेमानंद चावडीकर, सहकार रत्न पुरस्कार विजेते