कोलवाळ तुरुंगातील कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंची ‘सीजे' ब्रँडखाली विक्री


28th February, 12:21 am
कोलवाळ तुरुंगातील कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंची ‘सीजे' ब्रँडखाली विक्री

कैद्यांनी बनविलेल्या वस्तू निरखून पाहताना पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग, तुरुंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : कोलवाळ तुरुंगातील कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंची सीजे ब्रँड नावे विक्री होणार आहे. मंगळवारी पणजी येथील हिरा पेट्रोल पंप येथे या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग, तुरुंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई व अन्य अधिकारी उपस्थित होते.

जसपाल सिंग यांनी सांगितले की, तुरुंगातील कैद्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. येथे कैद्यांनी बनविलेल्या हस्तकला, लाकडी वस्तू , मेणबत्त्या तसेच अन्य कलाकुसरीच्या वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग कैद्यांना देण्यात येणार आहे.

ते म्हणाले, कैद्यांच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतात. याआधी दिल्ली येथे असाच उपक्रम करण्यात आला होता. हा उपक्रम यशस्वी ठरल्यास आम्ही राज्यात अन्य ठिकाणी देखील अशी उत्पादने मिळणारी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नागरिकांना या दुकानाला भेट देऊन जास्तीत जास्त वस्तू खरेदी कराव्यात.

ओमवीर सिंग बिष्णोई यांनी सांगितले की, सध्या तुरुंगातील ९८ कैद्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. येणाऱ्या काळात या संख्येत वाढ होणार आहे. आम्ही महिला कैद्यांसाठी विशेष बेकरी उत्पादन युनिट व मसाला युनिट सुरू करण्याचा विचार करत आहोत. आम्ही तुरुंगातील कैद्यांना विविध कामे देत आहोत. नुकतेच आम्ही तुरुंगातील रंगकाम, सौंदर्यीकरणासाठी देखील कैद्यांची मदत घेतली होती. 

हेही वाचा