चिखलीतील घरांच्या पुनर्मूल्यांकनाचा ठराव

महसुलात सातपट वाढ होण्याचा सरपंचांना विश्वास

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th February, 12:29 am
चिखलीतील घरांच्या पुनर्मूल्यांकनाचा ठराव

ग्रामसभेत बोलताना सरपंच कमलाप्रसाद यादव. बाजूस इतर पंच. (अक्षंदा राणे)

वास्को : चिखली पंचायत क्षेत्रातील सर्व घरांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. पुनर्मूल्यांकनामुळे चिखली पंचायतीच्या महसुलात सातपट वाढ होण्याची शक्यता सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी व्यक्त केली.
गेल्या २५-३० वर्षांमध्ये येथील घरांचे पुनर्मूल्यांकन करण्यात आलेले नाही. येथील रहिवाशांनी २५-३० वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांवरच घरपट्टी घेतली जाते. त्यावेळी त्यांच्या घरांची क्षेत्रफळ ५० चौरसमीटर होते. परंतु आता ते घर २०० ते ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे झाले आहे. त्यामुळे पुनर्मूल्यांकनामुळे मोठा महसूल जमा होणार आहे, असे सरपंचांनी सांगितले. घरांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सर्व्हेअरची नेमणूक करण्यात येणार आहे. त्या सर्व्हेअरने गोव्यातील सात-आठ ग्रामपंचायतीतील घरांचे पुनर्मूल्यांकन केले आहे. तेथे मोठा महसूल जमा होऊ लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुनर्मूल्यांकनामुळे महसूल वाढेलच, शिवाय रहिवाशांची सर्व माहिती ग्रामपंचायतीकडे गोळा होईल. जेणेकरून रहिवाशांना विविध योजना, बैठकांची माहिती देता येईल. लवकरच आम्ही सर्व गोष्टी ऑनलाईन करणार आहोत. त्यावेळी या माहितीचा उपयोग होईल, असे ते म्हणाले. प्रत्येक प्रभागामध्येही ग्रामसभा घेण्यासंबंधी ठराव घेण्यात आला आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
पंच फ्रान्सिस नुनीस यांनीही घरांचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक प्रभागांमध्ये ग्रामसभा घेण्याच्या ठरावामुळे लोकांचे प्रश्न समजण्यास मदत होणार आहे. रहिवाशी आपले प्रश्न चांगल्या रीतीने मांडू शकतील, असे ते म्हणाले. 

हेही वाचा