मुख्यमंत्र्यांची विधानसभा सभागृहात हमी
पणजी : गोवा विद्यापीठाकडून कंत्राटी तत्त्वावर पदे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून कायमस्वरुपी नोकरभरती केल्याच्या प्रकरणाची शिक्षण सचिवांकडून चौकशी करू, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी सभागृहात दिली.
आमदार कार्लुस फेरेरा यांनी विधानसभेत याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. गोवा विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी कंत्राटी पद्धतीवर काही पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोटीस जारी करीत इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्जही मागवले होते. परंतु, त्यानंतर मात्र ही तेथे कायमस्वरुपी नोकरभरती करण्यात आली. या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी आमदार फेरेरा यांनी केली. त्यावर गोवा विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. तरीही शिक्षण सचिवांमार्फत विद्यापीठातील नोकरभरतीची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.
दरम्यान, विद्यापीठातील या नोकरभरतीसंदर्भात इतरही काही जणांनी यापूर्वी आवाज उठवला होता. पण विद्यापीठ स्वायत्त संस्था असल्याने सरकारने त्यावर भाष्य करणे टाळले होते. आता मात्र आमदार फेरेरांनी हा विषय सभागृहापर्यंत नेल्याने चौकशीची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.