माजी कायदामंत्री रमाकांत खलप यांचे आवाहन
पेडणे : राज्यात सिविल कोर्ट चालविले जाते, त्याच धर्तीवर सरकारने महसूल न्यायालय स्थापन करावे. या न्यायालयामध्ये केवळ कूळ मुंडकारांचे खटले घेऊन ते निकाली काढावेत, असे आवाहन माजी कायदामंत्री रमाकांत खलप यांनी पेडणे तालुका नागरिक समितीने आयोजित केलेल्या मुंडकार जनजागृती सभेत केले.
पेडणे तालुका नागरिक समितीने कुळमुंडकार जनजागृती सभा पेडणे येथील श्री भगवती हायस्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित केली होती. त्यावेळी मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, अॅड. प्रभाकर नारुलकर, पेडणे तालुका नागरिक समितीचे अध्यक्ष पुंडलिक धारगळकर, कुळमुंडकार संघटनेचे अध्यक्ष दुमिंग फर्नांडिस, उपाध्यक्ष व्यंकटेश नाईक, जामन मांद्रेकर, शिवकुमार आरोकर आदी उपस्थित होते.
खलप यांनी सांगितले की, महसूल न्यायालय तयार करताना त्यात मामलेदार, उपजिल्हाधिकारी, लवाद प्रशासक अशी रचना असावी. त्यांना कुणाचेच फोन येणार नाहीत, याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्यांनी केवळ न्याय देण्याचे काम करावे. त्यांना इतरत्र कायदा सुव्यवस्था बिघडली तर ती जबाबदारी त्यांना नसावी. महसूल न्यायालयात केवळ कुळमुंडकारांचेच खटले चालतील. ती जबाबदारी त्या न्यायालयावर असेल अशी रचना करावी.
यावेळी अॅड. प्रभाकर नारुलकर यांनी सांगितले की, १९६२ सालचे कूळ मुंडकार खटले आजही न्यायालयात सुरू आहेत. अशाप्रकारे खटले चालले तर न्याय कुणाला मिळेल?
यावेळी व्यंकटेश नाईक, दुमिंग फर्नांडिस व पुंडलिक धार्गळकर यांची भाषणे झाली. शिवकुमार आरोलकर यांनी सूत्रसंचालन केले.
शेतकऱ्यालाच शेतजमीन विकत घेण्याचा कायदा करा!
भविष्यात शेतकरी असेल तर शेतजमीन त्यांना विकत घेता येईल तशी महसूल कायद्यात तरतूद करा. शेतीचे रूपांतर बिगर शेतीत होणार नाही, तसा कायदा हवा. एखाद्या व्यक्तीने जमीन विकत घेतली तर त्याचे रेकॉर्ड असायला हवे, अशी सूचना अॅड. रमाकांत खलप यांनी केली