मडगाव : इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) २०२३-२४ आवृत्तीत पहिल्या ६ सामन्यांत एकही पराभव न पत्करलेला एफसी गोवा रविवारी (३ डिसेंबर) घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्स एफसीविरुद्धशी दोन हात करेल. फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या दोन टॉप संघांमधील लढतीने फुटबॉल चाहत्यांना सर्वोत्तम फुटबॉल अनुभवता येईल.
सामनापूर्व पत्रकार परिषदेत शनिवारी एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मॅनोलो मार्केझ यांनी केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या सामन्याबाबत भूमिका स्पष्ट केली. आम्ही मोसमाची जोरदार सुरुवात केली आहे. शेवटच्या सामन्यातही आम्ही गोल करण्याच्या खूप संधी निर्माण केल्या. अपेक्षेपेक्षा लवकर खेळ संपवण्याची संधी मिळाली आणि त्यात आम्हाला यश आले. आम्ही आमची स्थिती कायम राखत बदली खेळाडूंच्या बाबतीतही ग्राउंडवर चांगली कामगिरी केली.
आम्हाला केरळा ब्लास्टर्सविरुद्ध खेळतानाची आव्हाने माहिती आहेत. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्या खेळ क्षमतांना कमी लेखू शकत नाही. इव्हान (वुकोमानोविक, केबीएफसी मुख्य प्रशिक्षक) आणि माझे चांगले नाते आहे. ते खूप कॉम्पेटेटिव्ह आहेत. शिवाय संघातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता निर्माण करण्यात सक्षम आहे, असे मार्केझ पुढे म्हणाले.
त्यांनी आमच्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत, परंतु असे काही वेळा देखील होते जेव्हा त्यांच्याकडे प्रमुख खेळाडू उपलब्ध नव्हते. तरीही ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी राहण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आजचा सामना तितका सोपा नसेल. आयएसएलमधील प्रत्येक सामना ही एक लढाई आहे आणि आम्ही खडतर लढतीसाठी सज्ज आहोत.
स्पॅनियार्डनी गौर्सच्या अपराजित मालिकेसह गुणतालिकेतील दुसर्या स्थानावरही भाष्य केले. लीग सामने संपतील तेव्हा आम्ही कुठल्या स्थानावर असू, हे आताच सांगणे घाईचे ठरेल. काही संघांनी आठ तर काही चार खेळ खेळले आहेत. कदाचित या महिन्याच्या अखेरीस, जेव्हा सर्व संघ प्रत्येकी १०-१२ सामने खेळतील तेव्हा आमच्यासमोर एक चित्र स्पष्ट असेल, असे ते पुढे म्हणाले.