किशोर कदम ‘सौमित्र’ : रवींद्र भवन, मडगावच्या ‘काव्यानंद’चे उद्घाटन
‘काव्यानंद’ उपक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना संगीतकार अशोक पत्की, कवी किशोर कदम (सौमित्र), मडगावचे आमदार दिगंबर कामत, राजेंद्र तालक, मनोहर बोरकर, दामू नाईक. (कविता आमोणकर)
नावेली : चांगली कविता तीच असते, जिचे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अनेक अर्थ काढता येतात. कवी हा नेहमीच संवेदनशील असावा. आजूबाजूच्या परिस्थितीचा त्याच्या संवेदनशील मनावर परिणाम होतो, तेव्हा कवीच्या मनातील जखम ही उघडी पडते आणि या भळभळत्या जखमेतून कवितेचे शब्द स्फुरत जातात, असे प्रतिपादन कवी किशोर कदम (सौमित्र) यांनी केले.
रवींद्र भवन, मडगावतर्फे बा. भ. बोरकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘काव्यानंद’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कवी किशोर कदम (सौमित्र), मडगावचे आमदार दिगंबर कामत, रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, उपाध्यक्ष मनोहर बोरकर, रवींद्र भवनचे माजी अध्यक्ष दामोदर नाईक यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला बाकीबाब यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर डॉ. अजय वैद्य यांनी घेतलेल्या मुलाखतीतून अशोक पत्की आणि किशोर कदम (सौमित्र) यांनी कविता आणि गाणी यांच्या सुरांत उपस्थितांना भिजवताना अनेक आठवणींचा खजिना उलगडून दाखवला.
या कार्यक्रमात अशोक पत्की आणि किशोर कदम या जोडगोळीने आपल्या गाणी आणि कवितेच्या जीवनप्रवासातील अनेक आठवणी सांगितल्या. अशोक पत्की यांनी स्वत: संगीतबद्ध केलेल्या काही जिंगल्स, मालिकेची शीर्षक गीते सादर केली व त्यांच्या आठवणी सांगितल्या. किशोर कदम यांनी ‘ऊन जरा जास्त आहे...’ ही कविता आपल्या दमदार आवाजात सादर करताना उपस्थितांची मने जिंकली. ‘गारवा’ या अल्बममधील कवितांच्या ओळी आपल्याला कशा आणि कधी सुचल्या हे सांगताना त्यांनी प्रेक्षकांत हशा पिकवला.
कवी जेव्हा एखादी कविता किंवा गाणे लिहितो, तेव्हा त्याच्या कवितेतील शब्दांमध्ये चाल, लय आणि ग्येयता आधीच असते. आपल्याला त्याचा फक्त अर्थ समजून घ्यावा लागतो. कविता ठरवून कधीच लिहिली जात नाही. कधी कधी तर अवघ्या दोन मिनिटांत कविता किंवा गाणे तयार होते, असे प्रतिपादन अशोक पत्की यांनी केले.
स्वागत करताना रवींद्र भवन, मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक म्हणाले की, रवींद्र भवनतर्फे गोव्यातील कलाकार, कवी यांना त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी ‘काव्यानंद’ या कार्यक्रमात गोव्यातील कवींना त्यांचे स्वत:चे एक व्यासपीठ मिळणार आहे, जिथे ते आपल्या कवितांचे सादरीकरण करू शकतील. यावेळी त्यांनी रवींद्र भवनतर्फे आयोजित उपक्रमांची माहिती दिली.
आमदार दिगंबर कामत यांनी बाकीबाब बोरकर यांच्या कवितेमुळे गोव्याचे नाव देशात सर्वत्र नावाजले गेल्याचे सांगितले.
दामू नाईक यांनी प्रस्ताविकात सांगितले की, ज्याला वाचनाची आवड आहे, त्याच्याकडे लेखनाची शैली आपसूक येते.
त्यानंतर गोव्यातील अमेय नाईक, आंबेश तळवडकर, डॉ. श्यामा सिंगबाळ, आमोद कुलकर्णी, संजीव भरणे, अभय सुराणा यांनी कविता सादर केल्या.