मंत्रिमंडळ फेररचना : भाजपचे प्राधान्यक्रम का बदलत आहेत?

माविन गुदिन्हो आणि बाबूश मोन्सेरात हे दोघे मंत्री वादग्रस्त पार्श्वभूमी असूनही भाजपला परवडतात, पण काब्राल यांच्यावर मोठा कुठलाच आरोप नसतानाही काब्राल यांचा बळी देण्याचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री आणि सरकारवर जेव्हा विरोधक टीका करायचे तेव्हा काब्रालच विरोधकांवर तुटून पडायचे. त्यामुळे विरोधकांनाही काब्राल यांचा बळी जात असल्याचा आनंद वाटत आहे.

Story: उतारा | पांडुरंग गांवकर |
19th November 2023, 03:32 am
मंत्रिमंडळ फेररचना : भाजपचे प्राधान्यक्रम का बदलत आहेत?

काम न करणारे मंत्री एरव्ही बदलले जातात. काहीवेळा चांगले काम करणारे मंत्रीही आपल्या वागणुकीमुळे पक्षाच्या कारवायांचे बळी ठरतात. नीलेश काब्राल यांच्याबाबत असेच काहीसे होण्याची शक्यता आहे. चांगले काम करत असले तरी कामासोबतच जीभेलाही लगाम असायला हवा. काम रात्रंदिवस करता, पण जर दुसऱ्याला कमी लेखत असाल तर त्याचेही परिणाम गंभीर होतात. गोव्यात ज्याला ‘तोंडाने दाट’ असे म्हटले जाते तसे काब्राल यांच्याबाबत आज बोलले जात आहे. पण काब्राल यांची दुसरी बाजूही आहे. मतदारसंघातील कामांसाठी, सरकारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी खात्यांमध्ये खेपा मारणारे काब्राल आमदार असताना पत्रकारांना सचिवालयात दिसायचे. किंवा कुठल्या तरी सरकारी कार्यालयातून काब्राल बाहेर पडतानाही अनेकदा दिसायचे. काही अधिकारीही काब्राल हे मतदारसंघातील कामाच्या प्रस्तावांचा फोलोअप घेण्यासाठी कसे स्वत: खेपा मारतात ते सांगत असत. एकेकाळी कुडचडेच्या तत्कालीन आमदाराचे जवळचे असलेले काब्राल नंतर स्वत:च निवडणूक लढवून आमदार झाले. भाजपच्या ख्रिस्ती आमदारांपैकी काब्राल हे कायम सरकारच्या बाजूने विधानसभेत विरोधकांना प्रत्युत्तर देत असत. विधानसभेच्या सभागृहात सरकारच्या समर्थनात पटकन उभे राहून विरोधकांशी दोन हात करण्यात काब्राल यांचा हात कोणी धरू शकत नाही. पण आता जेव्हा मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा प्रस्ताव मार्गी लागण्याची वेळ आली तेव्हा नीलेश काब्राल यांनाच मंत्रिमंडळातून वगळण्याचा विचार भाजप करत आहे. यामागे लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्याची जागा मिळवणे यापासून ते ख्रिस्ती आमदाराला मंत्रिमंडळात घेण्यासाठी ख्रिस्ती मंत्र्याला हटवणे असे अनेक तर्क आहेत जे राजकीयदृष्ट्या भाजपसाठी योग्य आहेत. पण ख्रिस्ती मंत्र्याला हटवायचेच झाले तर अजून दोन मंत्री आहेत, ज्यांच्या कामाचाही जमाखर्च तपासण्याची गरज होती. काब्राल वगळता अन्य दोन ख्रिस्ती मंत्र्यांवर न्यायालयात खटले सुरू आहेत. दोन्ही मंत्र्यांवरील खटले गंभीर स्वरुपाचे. एकावर तर एकापेक्षा जास्त खटले सुरू आहेत. दोन्ही मंत्री वयाने ज्येष्ठ असले तरी त्यांची वादग्रस्त पार्श्वभूमी आणि त्यांचे कारनामे या गोष्टींचा भाजपला काही फरक पडत नाही हा आज भाजप बदलत असल्याचा आणखी एक पुरावा आहे. भाजपचे प्राधान्यक्रम बदलत आहेत याचाही हा एक नमुना आहे.

काब्राल यांचे मंत्रिपद जाऊ शकते आणि त्याबाबत हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या आल्यानंतर काब्राल यांच्याविषयी अनेक प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटू लागल्या. माविन गुदिन्हो आणि बाबूश मोन्सेरात यांना वाचवून भाजप काब्रालचा बळी देत आहे यावर अनेक लोक खूश आहेत ही बाब बदलत्या सामाजिक मानसिकतेचे प्र​तीक आहे का, यावरही विचार व्हायला हवा. हा विचार राजकीय पक्षांनी नव्हे तर जनतेने करण्याची गरज आहे. काब्राल अमुक, काब्राल तमूक अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करू लागले. गोव्यातील रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे ही समस्या कायमची जी काब्राल यांनाही एक-दीड वर्षात सोडवता आली नाही हे काब्राल यांचे अपयश म्हणावेच लागेल. नीलेश काब्राल त्या गोष्टींवरूनही बरेच ट्रोल झाले. मंत्री म्हणून मर्यादेत राहून बोलण्याची गरज असते. पण काब्राल काहीवेळा सडेतोड बोलायच्या नादात वाहत जायचे. त्यामुळेच काब्राल यांना आज सहानुभूती नाही. रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात बसून काम करणे, खात्यांमध्ये अनेक नवे बदल करून प्रशासन लोकांच्या जवळ नेण्याचे प्रयत्न करणे किंवा आपल्या मतदारसंघातील बऱ्याच लोकांना संकटाच्या काळात मदत करणे अशा गोष्टी काब्राल करत असले तरी आज काब्राल यांचा पत्ता कापण्याचा विचार भाजप करत असताना काब्राल यांच्या मदतीला कोणीच येत नाही. माविन गुदिन्हो आणि बाबूश मोन्सेरात हे दोघे मंत्री वादग्रस्त पार्श्वभूमी असूनही भाजपला परवडतात, पण काब्राल यांच्यावर मोठा कुठलाच आरोप नसतानाही काब्राल यांचा बळी देण्याचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री आणि सरकारवर जेव्हा विरोधक टीका करायचे तेव्हा काब्रालच विरोधकांवर तुटून पडायचे. त्यामुळे विरोधकांनाही काब्राल यांचा बळी जात असल्याचा आनंद वाटत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे काब्राल यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी. काब्राल यांचे मंत्रिपद गेले तर पाटकर यांना कुडचडेत पक्ष पुनर्बांधणीसाठी चांगली संधी येईल अशा पद्धतीने भाजपातील या राजकारणाचा काँग्रेसलाही भविष्यात फायदाच होऊ शकतो. पण मुळात विधानसभा निवडणुकीला अजून साडेतीन वर्षे आहेत.

माविन गुदिन्हो आणि बाबूश मोन्सेरात यांच्यावर खटले असताना आणि दोघेही वादग्रस्त असताना त्या दोघांना अभय देत पक्षाला लाभ होत असलेल्या नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून हटविण्याचा विचार भाजपने करणे यातून हा सगळा खटाटोप भाजपला दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात फायद्याचा ठरेल का ते पहावे लागले. सासष्टीत भाजपला मतांची आघाडी गरजेची आहे. काँग्रेसमधून भाजपात पक्षांतर करताना मंत्रिपदाचे आश्वासन मिळालेल्या आलेक्स सिक्वेरा यांना शेवटी एका वर्षानंतर मंत्रिपद मिळण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. सासष्टीत दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, उल्हास नाईक तुयेकर, आलेक्स रेजिनाल्ड यांच्या माध्यमातून भाजप लोकसभेच्या निवडणुकीत लाभ मिळवण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याचाच विचार करून मंत्रिमंडळातील बदल लोकसभा निवडणुकीपूर्वी होत आहेत.

आलेक्स सिक्वेरा यांनी आपल्या विचारधारेच्या विरोधात जाऊन भाजपात प्रवेश केला होता. अनुभवी नेता आणि एकेकाळी काँग्रेसला पदरमोड करून मदत करणारा हा नेता भाजपच्या मंत्रिमंडळात आला तर त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत भाजपला होईल असे भाजपला वाटते. पण भाजपला सासष्टीत मतांची आघाडी देण्यासाठी सिक्वेरा यांना मात्र मोठी कामगिरी बजावावी लागेल. कंबर कसण्याच्या पलीकडे सिक्वेरा यांची जबाबदारी असणार आहे. गोव्यात भाजपला लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकायच्या आहेत. दक्षिण गोव्याची जागा मिळवण्यासाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनाच भाजप संधी देण्याच्या विचारात आहे. पण भाजपातही आता गणिते बदलत असल्यामुळे सावईकर यांच्या स्पर्धेत अनेक नेते उतरलेले आहेत. सभापती रमेश तवडकर, दामू नाईक, बाबू कवळेकर यांच्यासह काहींनी दिगंबर कामत यांनाही गळ घालायला सुरुवात केली असल्यामुळे भाजपचा उमेदवार ठरवतानाही वेगवेगळी गणिते पाहूनच निर्णय घेतला जाईल. सध्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्याचे मूळ पक्षांतराच्या घटनेत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी होतो की नाही ते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.