आता पोर्तुगीज दस्तावेजांचे इंग्रजी भाषांतर ऑनलाईन

३५० रुपये प्रति पान : पुराभिलेख खात्याकडून ऑनलाईन सेवा सुरू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September 2023, 11:45 pm
आता पोर्तुगीज दस्तावेजांचे इंग्रजी भाषांतर ऑनलाईन

पणजी : पोर्तुगीज भाषेतील दस्तावेजांचे इंग्रजी भाषांतर आता ३५० रुपये प्रति पान या दराने उपलब्ध करण्यात येणार आहे. मंगळवारी पुराभिलेख खात्याने ही सेवा ऑनलाईन स्वरूपात सुरू केली. यावेळी पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, संचालक रोहित कदम, शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर आणि बालाजी शेणवी उपस्थित होते.
यावेळी मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, खात्याकडील पुराभिलेख हे दक्षिण आशियातील सर्वांत जुने आहेत. येथे १४९८ पासूनच्या पोर्तुगीज भाषेतील नोंदी उपलब्ध आहेत. संशोधक किंवा अन्य लोकांना या नोंदी भाषांतर करण्यासाठी प्रति पान १ ते २ हजार रुपये द्यावे लागत होते. याचा विचार करून आम्हीच खात्यातर्फे स्वस्त दरात ही सेवा सुरू करण्याच्या निर्णय घेतला.
आम्ही भाषांतरकारांसाठी अर्ज मागविले होते. आलेल्या उमेदवारांची परीक्षा घेऊन त्यातील १५ जणांना खात्यासोबत काम करण्यास नियुक्त केले आहे. हे भाषांतरकार व्यवसायिक पद्धतीने लोकांचे काम करून देतील. यामुळे लोकांना कमी दरात अधिकृत भाषांतर करून मिळणार आहे. ही सेवा ऑनलाईन असल्याने वारंवार फेऱ्याही माऱ्याव्या लागणार नाहीत.
याशिवाय यावेळी विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास, वारसा समजावा यासाठी राज्यातील तीन शिक्षण संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. तसेच खात्यातील कागदपत्रांच्या साहाय्याने केलेले संशोधन प्रकाशित करण्यासाठी मुख्यमंत्री पुराभिलेख योजनाही सुरू करण्यात आली आहे.

डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर शिष्यवृत्तीची घोषणा
यावेळी मंत्री फळदेसाई यांनी डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर शिष्यवृत्तीची घोषणा केली. कनिष्ठ संशोधनासाठी कनिष्ठ गटात २० महिन्यांसाठी महिना २५ हजार, तर वरिष्ठ गटासाठी २० महिन्यांसाठी महिना ४० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.