खुल्या जागेतील प्रकल्पावरून सांताक्रूझ ग्रामसभेत खडाजंगी

माजी सरपंचाकडून पंचायत मंडळ धारेवर : फ्लॅट हस्तांतरण शुल्कात वाढ


29th May 2023, 12:16 am
खुल्या जागेतील प्रकल्पावरून सांताक्रूझ ग्रामसभेत खडाजंगी

खुल्या जागेतील प्रकल्पाच्या मंजुरीच्या मुद्द्यावरून एकमेकांना जाब विचारताना उपसरपंच डॉमनिक परेरा व माजी सरपंच मारियानो अारावजाे. (मान्युएल वाझ)

प्रतिनिधी । गोवन वार्ता

जुने गोवा : फ्लॅट्सच्या हस्तांतरणाच्या शुल्कात वाढ, खुल्या जागेतील प्रकल्प आदी विषयांवरून सांताक्रूझ पंचायत मंडळ आणि माजी सरपंच मारियानो अारावजो यांच्यात रविवारी ग्रामसभेत जोरदार खडाजंगी झाली.

अारावजो यांनी फ्लॅट हस्तांतरित करण्यासाठी शुल्कात मनमानी वाढ केल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि शुल्क कमी केले जावे, असे सांगितले. मात्र, पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते केवळ पूर्वीच्या पंचायत मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत आहेत. त्यानंतर अारावजो यांनी पंचायतीने मंजुरी दिलेल्या खुल्या जागेतील प्रकल्पाच्या मुद्द्यावर भर दिला. यापूर्वीच्या पंचायत मंडळानेच या प्रकल्पाला मंजुरी देण्याचा ठराव घेतला होता, असे स्पष्टीकरण उपसरपंच डॉमनिक परेरा यांनी दिले. यावरून आरावजो व परेरा यांच्यात खडाजंगी झाली.

दरम्यान, सचिव महेश नाईक लवकरच निवृत्त होणार असल्याने त्यांना पंचायतीने निरोप दिला. गावाच्या विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पंचायतीने सचिवांचे आभार मानले.

सरपंच जेनिफर ऑलिव्हेरा यांनी सांगितले की, सरकारच्या दीनदयाळ योजनेंतर्गत नवीन पंचायत घर बांधले जाईल. कचऱ्याच्या समस्येला तोंड देण्याच्या मुद्द्यावर, उपसरपंच परेरा म्हणाले की, गावात कचरा किंवा डेब्रिज टाकणाऱ्यांना पकडून देणाऱ्यांना पंचायत बक्षीस देईल.

हेही वाचा