सत्तरीच्या ग्रामीण पर्यटनाला दंगामस्तीचे गालबोट

पावसाळ्यात चोर्ला घाट अन् उन्हाळ्यात वाळवंटी : कारवाईची मागणी


27th May 2023, 12:58 am
सत्तरीच्या ग्रामीण पर्यटनाला दंगामस्तीचे गालबोट

वाळवंटी नदी तीरावर दारूच्या बाटल्यांचा पडलेला खच.

वार्ताहर । गोवन वार्ता

केरी-सत्तरी : सत्तरीतील केरी, मोर्ले, पर्ये भागातून वाहणाऱ्या वाळवंटी नदीचे डोह आंघोळीसाठी गजबतात. अलिकडे येथे तरुणाईकडून दारूच्या नशेत दंगामस्ती होत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे नदीचे किनारे अस्वच्छ बनत आहेत. त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे.      

राज्यातल विविध भागांतून लोक मोर्ले, केरी, पर्ये आदी भागातील वाळवंटी नदीत आंघोळीसाठी मोठ्या संख्येने येत आहेत. पावसाळा सुरू झाला की चोर्ला घाटात दंगामस्ती सुरू होते. त्यामुळे पावसाळा असो किंवा उन्हाळा स्थानिकांना दारुड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.      

पर्यटक खाण्या-पिण्याचे पदार्थ घेऊन येतात. त्याचबरोबर थंडपेये आणि बहुतेकजण मद्यपेये आणतात. नदीत आंघोळ करणे आणि तीरावर बसून खाणे-पिणे हा प्रकार पहायला मिळत आहे.

नदी किनारी येणारे पर्यटक प्लास्टिक कचरा, बाटल्या किंवा दारूच्या बाटल्या तिथेच टाकून जातात. त्यामुळे नदी तीरावर कचऱ्याचा खच वाढत चालला आहे. कचरा सर्वत्र पसरत असल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. मोर्ले-पेळावदा येथील तीरावर कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. दरम्यान, या किनाऱ्यावर कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. संबंधित पंचायतीने हा कचरा गोळा करून घेऊन जावा, अशी मागणी मीलन मोरजकर यांनी केली आहे.

कर्णकर्कश संगीत, वादाचे प्रकार

तरुणाईचे गट आपल्यासमवेत साऊंड सिस्टीम घेऊन येतात. संगीताच्या तालावर मौजमजा केली जाते. बऱ्याच वेळा एका पेक्षा अधिक गट असे प्रकार करत असल्याने त्यांच्यात वाद होतात. पेळावदा मोर्ले येथील ‘उभो गुणो’ डोहाकडे येताना मोरजकरवाडा येथे रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी गाड्या उभ्या करून अडथळा निर्माण केला जात आहे. वेगाने गाड्या हाकल्याने स्थानिकांना धोका निर्माण झाला आहे. नदी किनारे बाहेरील लोकांनी व्यापल्याने स्थानिकांना जाण्यास प्रतिबंध येतो. इथल्या नदीचे डोह खोल असल्याने आणि दारूच्या नशेत आंघोळ करणारे तरुण बुडण्याचा धोका आहे. संबंधित यंत्रणेने यावर प्रतिबंध आणावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा