राष्ट्रीय धुव्रीय व महासागर संशोधन केंद्राचे कार्य उल्लेखनीय : रिजिजू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th May 2023, 11:45 pm
राष्ट्रीय धुव्रीय व महासागर संशोधन केंद्राचे कार्य उल्लेखनीय : रिजिजू

वास्को : राष्ट्रीय धुव्रीय व महासागर संशोधन केंद्र आपल्या नाविन्यपूर्ण अभ्यास तसेच मजबूत पायाभूत सुविधांद्वारे ध्रुवीय व दक्षिण महासागरातील रहस्ये उलगडण्यात महत्त्वाची भूमिका बजावित असल्याचे केंद्रीय वसुंधरा विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी येथे एका कार्यक्रमात स्पष्ट केले.

किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय ध्रुवीय व महासागर संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील पाहणी केली. त्यांनी सडा बोगदा पठारावरील राष्ट्रीय धुव्रीय व महासागर संशोधन केंद्राच्या कामगिरीचे कौतुक तसेच ध्रुवीय व सागरी संशोधनात महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱ्या वैज्ञानिकांच्या कामगिरीचा गौरव केला.

या केंद्राने केलेल्या अभूतपूर्व संशोधनाने ते भारावून गेले. त्यांनी तेथील कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, राष्ट्रीय ध्रुवीय व महासागरी संशोधन केंद्राचे महासागरीय विज्ञानातील ज्ञानासाठी अथक प्रयत्न हे जागतिक नेतृत्व म्हणून देशाचे स्थान मजबूत करत आहे. या केंद्राला आवश्यक असलेली सर्व मदत मिळावी यासाठी प्रोत्साहन देणे हे माझे कर्तव्य आहे.

या केंद्राला दिलेली भेट अतिशय फलदायी ठरली आहे. मी केंद्रातील अधिकारी, वैज्ञानिक तसेच अंटार्क्टिका येथील वैज्ञानिकांशी संभाषण केले. राष्ट्रीय ध्रुवीय व महासागर संशोधन केंद्र रचनात्मक भूमिका बजावित आहे. त्याचा लाभ देशाला भविष्यात होणार आहे, असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी नील अर्थव्यवस्थेसंबंधी विचार व्यक्त केले.

सागर संशोधनात सरकारची मोठी भूमिका

नील अर्थव्यवस्था हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक व्हिजन आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाढण्यास मदत होईल. इतर देशांमध्ये महासागर संशोधनामध्ये सरकार तसेच इतर खासगी संस्था, कंपन्याही सहभागी होतात. परंतु भारतामध्ये सागर संशोधनात सरकारची भूमिका मोठी आहे. भविष्यात इतर कंपन्या, संस्था यांच्या सहयोगाने महासागर संसोधन करण्यात येईल, असे किरेन रिजिजू यांनी सांगितले. 

हेही वाचा