आज सकाळी सकाळी मुले टूरवरून घरी आली आणि येता येता नातीने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, "केव्हा एकदा घरी येतो असे झाले." शेवटी तुम्ही कुठेही जा घराची ओढ आपल्याला मागे परतायला लावतेच लावते.
घर हे आपले निवासस्थान आणि सर्वस्वही. घर, घरापुढे अंगण, अंगणात तुळशी वृंदावनासमोर विविध फुलांची बाग, परसदारात न्हाणीघर आणि विहीर. आंब्या फणसाचे झाड, शेवगा, केळी, बाजूला मोगरीचा मांडवावर चढलेला सुवासिक वेल वगैरे. हे झाले माझे माहेरचे घर, कमीअधिक फरकाने सासरचे घरही असेच आहे.
घर माणसाला स्थिरता देते. शांती, सुख, समाधान इथेच मिळते. लुटुपुटूची भांडणेही इथेच होतात आणि क्षणार्धात पेल्यातील वादळाप्रमाणे ती इथेच शमतात. दिवसभराच्या कष्टाने दमून भागून आल्यावर थकलेले पाय स्वतःच्याच घराकडे वळतात. तिथेच आपल्याला विश्रांती मिळते. हक्काची जागाही घर हीच असते जी विसाव्याची हमखास गॅरंटी देते. घर हे निर्जीव असूनही सजीव असते. त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात, खोलीत, माजघरात छोट्याछोट्या का होईना, आठवणी दडलेल्या असतात. या आठवणीच आपल्याला जगण्याची नवी उमेद देतात. कितीही वाईट प्रसंग आले, सगळ्या जगाने पाठ फिरवली तरीसुद्धा घर कधीच आपली साथ सोडत नाही. उलट अशा प्रसंगी घर आपल्याला दिलासा देते.
मुलगी विवाहास आल्यावर वर संशोधन करताना सर्वात आधी घराचा विचार घराचा केला जातो. नवऱ्याला राहते घर आहे की नाही, हा पहिला प्रश्न. नोकरी व्यवसाय नंतरची गोष्ट. घराला फक्त चार भिंतीच असून चालत नाही तर घराला घरपण हवे असते. येथे स्वर्गीचे सुख नांदायला हवे, तर मुले-माणसे, नातीगोती, मित्रपरिवार, आला-गेला, ज्येष्ठ आणि कनिष्ठांचाही आदर आणि प्रेमभाव जपणे गरजेचे.
घर कसेही असो, झोपडी असो वा चंद्रमौळी, कौलारू असो वा मध्यमवर्गीयांचे, माजघर असलेले घर, चौसोपी वाडा असो वा मोठा बंगला असो किंवा राजमहालही असू दे भावना एकच असते " ते माझे घर." आकाशात भरारी घेणाऱा पक्षीगण सुद्धा स्वतःसाठी एक सुंदर से घरटे बांधतो. त्यात आपला जीव ओततो. निसर्गातील प्रत्येक सजीवाला घर हे असतेच मग ती गुहा असू दे बीळ असू दे किंवा खडकाची कपार असू दे.
आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी घराची ओढ तितकीच असते आणि ती कायमस्वरूपी असते. सीमेवर लढणारा सैनिक घराच्या आठवणीने व्याकुळ होतो, पण कर्तव्य बजावल्यानंतर तो जेव्हा घरी परततो तेव्हा घर त्याच्यासाठी एक पवित्र मंदिर असते. एक दीर्घ श्वास घेऊन तो सगळी ऊर्जा मनात साठवून घेतो आणि त्या बळावरच सीमेवर आपले कर्तव्य चोख बजावतो. घर त्याची प्रेरणा असते.
घर आपणाला अन्न ,वस्त्र, निवारा, सुख, समाधान आणि सर्व काही. सुरक्षिततेची भावना आपल्याला घर देते. आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा घरच आपल्याला कुशीत घेते, मायेची फुंकर घालते, पुन्हा नव्याने जगण्याची शक्ती देते. यासाठीच घरातील वातावरण नेहमी उत्साही आनंदी समाधानी असायला हवे. सतत भांडणे, वाद, आदळआपट, चिडचिड, आरडाओरडा यासारखे तामसी प्रकार घरात वारंवार घडू देऊ नयेत. माझी आई सांगायची ' तुम्ही जसे घरात वागता बोलता त्याची दखल घर घेते. ते नेहमी अस्तू अस्तू असे म्हणत राहते आणि शेवटी तथास्तु म्हणजे तसेच होवो असे म्हणते. म्हणूनच म्हणते घरात शांततेने मिळून मिसळून एकमेकांना समजून घेऊन प्रेमाने राहावे त्याचे श्रेय घर आपल्याला नक्की देते. असे विचार ही एक ऊर्जाच आहे.
पूर्वी घरात येताना बाहेर असलेल्या घंगाळातले पाणी पायावर घालून घरात येणे होत असे, याचाच अर्थ बाहेरचे बाहेर ठेवून आत यावे. ज्याप्रमाणे मंदिरात प्रवेश करताना मंदिरातील मोठ्या घंटेखाली उभे रहावे, डोळे बंद करून घंटा वाजवावी, घंटेचा शेवटचा बारीक आवाज ऐकू येतो आणि डोक्यातले सगळे विचार निघून जातात. आपण स्वच्छ मनाने देवाच्या पायाशी नतमस्तक होतो. मंदिर हे सुद्धा एक घरच आहे जिथे देवाची वसती असते. तसेच घराचे आहे, बाहेरचे सगळे विचार बाहेरच ठेवून घरात प्रवेश करायचा असतो आणि घराचे मांगल्य अबाधित राखायचे असते.
पूर्वी नांदती घरे असायची. आता घराला माणसांची कमी आहे. घराचे गोकुळ ही संकल्पना आता बदलत चालली आहे. पूर्वी घरात पाहुणेरावळे सगेसोयरे आणि घरातील माणसे यांचा राबता असायचा. घराच्या दरवाजाला कुलूप कधी ठाऊकच नव्हते. त्यावेळी फार श्रीमंती होती अशातला भाग नाही पण मनाची श्रीमंती मात्र नक्कीच होती. त्यामुळे वास्तू ही खूश होती श्रीमंत होती. पूर्वीच्या मोठ्या हवेल्या आता मोठमोठ्या कुलपांच्या आड बंदिस्त असतात ऊजाड दिसतात.
एखाद्या घरात पाऊल ठेवल्यावर या घराला माणसे हवीत की नको हे कळते माणसे खोटे बोलतील पण घर खोटे बोलणार नाही हे नक्की. घर बोलते, घर सांगते, घराला सुद्धा घरातील माणसाप्रमाणे सवय लागते. एखाद्या घरात माणूस अवेळी आला तरीसुद्धा त्याचे आनंदाने स्वागत होते लगबगीने त्याचे आदरातिथ्य केले जाते. घरालासुद्धा तीच सवय लागते आणि मग घर बोलू लागते. एखाद्या माणसाला माणूस हवा किंवा नको हे सांगणे कठीण पण घर मात्र याबाबतीत अपवाद आहे ते नेहमी खरेच सांगते आणि ते खरे खरेच असते. मुलीला जशी माहेरची ओढ असते तशीच अतिथीनाही अशा घरांची ओढ असते. अशा घरातून सुसंस्कारित झालेली मुले माणसे नेहमीच सकारात्मक विचार करीत असतात ज्या विचारांची आज आपल्या मातृभूमीला निकडीची गरज आहे. यासाठी मी सदैव आग्रही असेन असावे सुंदर माझे घर.