भारताची आज निर्णायक टी-२०

लखनऊमध्ये न्यूझीलंडचे नवे आव्हान : मालिकेत यजमान भारत १-०ने पिछाडी


28th January 2023, 10:50 pm
भारताची आज निर्णायक टी-२०

न्यूज डेस्क। गोवन वार्ता      

लखनऊ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी हा 'करो या मरो' सामना असेल.       

खरे तर या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून २१ धावांनी पराभव झाला होता. अशा स्थितीत मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला लखनऊमध्ये होणारा टी-२० सामना जिंकावा लागेल.      

कशी आहे लखनऊची खेळपट्टी?      

लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. हे सर्व विजय काहीसे एकतर्फी झाले आहेत. अशा परिस्थितीत या विकेटवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक मदत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, रात्री दुसऱ्या डावात दव गोलंदाजांना अडचणीत आणू शकतो. अशा स्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही निर्णय घेणे कर्णधारासाठी सोपे नसेल.      

कसे आहे लखनऊचे हवामान?      

लखनऊमधील सामन्यादरम्यान तापमान १३ ते १५ अंशांच्या दरम्यान राहील. सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नाही. म्हणजे कोणताही अडथळा न येता सामना पूर्ण होईल.      

कसा आहे लखनऊमध्ये भारताचा विक्रम?      

भारतीय संघ लखनऊमध्ये दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून दोन्ही सामने जिंकले आहेत. दोन्ही वेळा भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. भारताने येथे श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.      

भारतासाठी ‘करा किंवा मरा’ सामना      

शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने त्याचा एकतर्फी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. यानंतर टीम इंडिया केवळ १५५ धावांवरच रोखली गेली. यासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता लखनऊमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने असतील. या सामन्यात संघाला मालिकेत पुनरागमन करण्याची शेवटची संधी आहे.      

या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला तर मायदेशातील मालिका गमवावी लागेल. टीम इंडियाला ते नक्कीच नको असेल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया कोणत्याही किमतीत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी पहिल्या सामन्यात झालेल्या चुकांमधून शिकून पुढे जाईल.      

टीम इंडिया बदलाचे संकेत      

पहिल्या सामन्यात अनेक खेळाडूंनी टीम इंडियाची निराशा केली होती. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत टीम इंडिया अपयशी ठरली होती. ईशान किशन बऱ्याच दिवसांपासून टी-२० मध्ये अपयशी ठरत आहे. गेल्या १२ डावांपैकी एकाही डावात त्याने ५० धावांचा आकडा गाठलेला नाही. त्याने १२ डावांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे अर्धशतक केले होते. मात्र त्यानंतर तो सातत्याने अपयशी ठरत आहे. संघाकडे पृथ्वी शॉच्या रूपाने आणखी एक सलामीवीर बसला आहे. ईशानच्या जागी संघ व्यवस्थापन शॉला संधी देऊ शकते.      

त्याचवेळी अर्शदीप सिंग गोलंदाजीत महागडा ठरला. त्याची भरपाई करण्यासाठी संघाकडे मुकेश कुमार आहे. मात्र, या खेळाडूने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. संघ व्यवस्थापनाने त्याला महत्त्वाच्या सामन्यात पदार्पणाची संधी दिल्यास आश्चर्य वाटणार नाही. याशिवाय संघात कोणताही बदल दिसत नाही.