‘झेवियर्स’च्या विद्यार्थी परिषदेचे अधिकारग्रहण ४ पूर्वी करा!

उपजिल्हाधिकाऱ्यांचा सेंट झेवियर्स महाविद्यालयाला आदेश


25th January 2023, 12:20 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधील विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेसाठी बैठक घेण्याकरीता बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी कॉलेज व्यवस्थापनाला पाच दिवसांची मुदत दिली आहे. येत्या ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान परिषदचा अधिकारग्रहण सोहळा करावा, असा आदेश उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी. यांनी दिला आहे.
येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संयुक्त बैठकीत सेंट झेवियर्स कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. ब्लँच मास्कारेन्हस, व्यवस्थापक फा. टोनी सालेमा व कॉलेजचे वकील, विद्यार्थी परिषदेच्या वतीने सरचिटणीस (जीएस) साहिल महाजन, प्रतिनिधी विनय राऊत व शिवानी वायंगणकर तसेच उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई, पोलीस निरीक्षक परेश नाईक तसेच शिक्षण खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठक तासभर चालली. दरम्यान, बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी कॉलेज प्रशासनाचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
बैठकीनंतर जीएस साहिल महाजन म्हणाले...
- उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत आमची संयुक्त बैठक झाली. बैठकीत दंडाधिकाऱ्यांनी कॉलेज व्यवस्थापनाला २४ ते २८ जानेवारी या पाच दिवसांत अधिकारग्रहण सोहळ्याची तारीख जाहीर करावी. आणि ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या पाच दिवसांत औपचारिक अधिकारग्रहण कार्यक्रम पार पाडावा, असा निर्देश दिला आहे.
- मी विद्यार्थी मंडळावर सरचिटणीस म्हणून जिंकून आलो आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने औपचारिक कार्यक्रम घेऊन विद्यार्थी परिषद मंडळाचा अधिकारग्रहण सोहळा करावा, ही आमची मागणी होती. त्यानुसार आम्ही उठाव केला होता. या अधिकारग्रहणाला २७ दिवसांचा विलंब झाला आहे. गोवा विद्यापीठाच्या नियमांनुसार दहा दिवसांत हा अधिकारग्रहण होणे अनिवार्य आहे.
- आमचा लढा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता. यात कोणतेच राजकारण नव्हते. किंवा आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. आम्ही आमचे म्हणणे उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले असून कॉलेज व्यवस्थापनाला मुदत दिली. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनावर आमचा विश्वास आहे. कॉलेज व्यवस्थापनाने यास प्रतिसाद न दिल्यास आम्ही पुन्हा दंडाधिकाऱ्यांची भेट घेऊ.                   

हेही वाचा