श्रद्धाच्या मारेकऱ्याला होईल कठोर शिक्षा

गृहमंत्री अमित शहांचे सूतोवाच

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
25th November 2022, 12:16 am
श्रद्धाच्या मारेकऱ्याला होईल कठोर शिक्षा

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष म्हणजेच सरकारी पक्ष श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्याला कठोर शिक्षा देईल, असे म्हटले आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. अमित शाह यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर थेट भाष्य करताना श्रद्धाचा उल्लेख केल्याचे दिसून आले.
दिल्लीमधील कार्यक्रमामध्ये शाह यांनी, “ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) नक्की घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या पॉलीग्राफ चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ही टेस्ट दिल्लीच्या रोहिणी स्थित न्यायवैद्यक प्रयोगशाळेत होत आहे. सर्दी-तापामुळे बुधवारी ही टेस्ट पूर्ण झाली नव्हती. या टेस्टमुळे आफतबाची नार्को टेस्ट लांबली आहे. ही टेस्ट पॉलीग्राफची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे.
भाईंदरच्या खाडीत ‘सर्च ऑपरेशन’ सुरू
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता भाईंदरच्या खाडीत सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. आफताबच्या मोबाईलचे लोकेशन खाडी परिसरात आढळल्यानंतर संशय बळावला होता. श्रद्धाचा मोबाईल किंवा काही पुरावे त्याने खाडीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी दोन पाणबुडे आणल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.