विनोदी भूमिकांमध्येच सर्वाधिक मेहनत : वरुण शर्मा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th November 2022, 12:05 Hrs
विनोदी भूमिकांमध्येच सर्वाधिक मेहनत  : वरुण शर्मा

पणजी : विनोद करणे दिसते तितके सोपे नसते. विनोदी भूमिकांमध्येच सर्वाधिक मेहनत घ्यावी लागते. एका सिनेमातील ऊर्जा दुसऱ्या सिनेमात कायम ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर सातत्याने काम करावे लागते. म्हणूनच विनोद हा खूप गंभीर व्यासंग आहे, असे प्रतिपादन अभिनेता वरुण शर्मा यांनी केले.

‘फुकरे’ या सिनेमापासून त्यांना मिळालेली प्रसिद्धी, त्यानंतर सातत्याने मिळत गेलेल्या भूमिका, विनोदी अभिनेता म्हणून स्थिरावल्याचा आनंद अशा अनेक गोष्टी त्यांनी प्रेक्षकांना सांगितल्या. फुकरेच्या तिसऱ्या भागाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत दिग्दर्शक म्रिगदीप सिंग लांबा यांनीही प्रेक्षकांसोबत संवाद साधला.

दोघांनीही विनोदी चित्रपट बनवत असताना सेटवरचे वातावरण खूप महत्त्वाचे असते असे सांगितले. अभिनेत्यासाठी आजूबाजूला सकारात्मकता असणे खूप गरजेचे असते. त्यातूनच त्याला आपली भूमिका उत्तम सादर करण्यास मदत होते, असे वरुण म्हणाले.

दिग्दर्शकासाठी संपूर्ण प्रक्रियेत खूप तणाव असतो. सर्व गोष्टी जमवणे, सर्व काही व्यवस्थित होणे अशा अनेक प्रकारचा तणाव ते हाताळत असतात. यावेळी अभिनेता व इतर समूहाकडून मिळणारी ऊर्जा खूप प्रेरणादायी असते, असे लांबा म्हणाले.

दरम्यान, प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शर्मा यांनी अनेक किस्से सांगितले. एखादी नवी भूमिका साकारण्यासाठी आधीचे सर्वकाही विसरणे गरजेचे असते. जे खूप अवघड असते असे ते म्हणाले. पुढे ग्रे शेडच्या तसेच थ्रिलर सिनेमांमध्ये काम करायला आवडेल असे ते म्हणाले. हसत खेळत झालेल्या या सत्राचा प्रेक्षकांनी भरपूर आनंद घेतला.

प्रत्येक दिग्दर्शक नवे देऊ शकतो

एकाच प्रकारचे सिनेमा करणारे अनेक दिग्दर्शक त्या प्रकारात प्रत्येकवेळी काहीतरी नवे देऊ शकतो. प्रत्येकाची कल्पनाशक्ती वेगळी असते असे लांबा यावेळी म्हणाले.