म्हापसा मार्केटमधून गुटखा जप्त

उपनगराध्यक्ष बेनकर, नगरसेवक फडके यांचा पुढाकार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th October 2022, 12:07 am
म्हापसा मार्केटमधून गुटखा जप्त

म्हापसा मार्केटमध्ये पानपट्टीवाल्याकडून पालिकेने जप्त केलेला गुटखा.

म्हापसा : येथील मार्केटमध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानपट्टीवाल्याला पकडून उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर व नगरसेवक विराज फडके यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच पालिका व पोलीस यांनी पानपट्टीवाल्याचा सुमारे १० किलो वजनाचा माल जप्त केला.
उपनगराध्यक्ष बेनकर व नगरसेवक फडके रविवारी बाजारपेठेत गेले होते. मार्केट यार्डच्या बाजूच्या बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावर एक पानपट्टीवाला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकत होता. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास येताच पालिका कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचा माल जप्त केला व व्यवसाय बंद करण्याचा आदेश दिला.
काही वेळाने त्या पानपट्टीवाल्याने पुन्हा व्यवसाय थाटल्याचे आढळून आले. उपनगराध्यक्ष बेनकर व नगरसेवक फडके यांना पाहून त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी त्याच्याकडून गुटखा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी इतर तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. या पानपट्टीवाल्यावर दंडात्मक कारवाई केली व त्यास सोडण्यात आले.