आठवण

जीवनातल्या काही रम्य आठवणीच आपल्याला आयुष्यभर साथ देतात. अशा आठवणींच्या हिंदोळ्यावर मन जेव्हा झोके घेते, तेव्हा या आठवणींचा सुखद गारवा मनाला रिझवतो. आणि या हिंदोळ्यावर झोके घेताना मन पुन्हा एकदा आठवणींच्या गर्तेत गिरक्या घेत रहाते. असे सुखद अनुभव, आठवणी आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आठवले, की मन पुन्हा एकदा ताजेतवाने होते. अशा आठवणी म्हणजे रेशमी लडीत जपलेली जणू काही मर्मबंधातली ठेव !

Story: मर्मबंधातली ठेव । कविता प्रणीत आमोणक� |
30th September 2022, 10:02 pm
आठवण

जन्म मुंबईचा आणि शिक्षणही मुंबईतच. त्यामुळे आयुष्याची पंचवीशी ही संपूर्णत: धावपळीतच गेली. बालमोहन विद्यामंदिर या शाळेच्या नावाचे तेव्हा फार मोठे प्रस्थ होते (आजही आहेच). बालमोहन शाळेचा विद्यार्थी म्हणजे तो हुशारच असणार, हे समीकरण तेव्हा होते. त्या काळी एसएससी बोर्डात सलग तीन वर्षे आमच्या शाळेतील उर्मिला रेगे, माधवी विद्वांस, पुनीत कर्णिक या तीन एका पाठोपाठ एका वर्षात प्रथम क्रमांकावर आल्या होत्या. त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेचा फार अभिमान वाटे.

शाळेतील प्रत्येक शिक्षक हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष देऊन त्याच्याकडून उत्तम कामगिरी करून घेण्यात पटाईत होते.  इनामदार सर, मराठे सर, दामले सर, वैद्य सर, शेणोय बाई, धुमे बाई, ठाकुर बाई, सामंत बाई या आणि इतर सर्व शिक्षकांनी आम्हां विद्यार्थ्यांसाठी जे कष्ट घेतले आहेत, त्यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी आहोत आणि राहू. कधी एखादा शिक्षक उपस्थित राहू न शकल्याने त्यांचा अभ्यासाचा तास ऑफ मिळायचा. आणि त्यावेळेस होणारा आनंद आम्हाला गगनात मावेनासा व्हायचा.

खरंच, आनंदाच्या व्याख्या त्या काळी किती अगदी समर्पक आणि लहानशा होत्या!! हा आनंद आम्ही खूप वेळा भरभरून अनुभवला. आणि आता आयुष्याकडे पाठी वळून पहाताना जाणवते, की हा आनंद पैशात न मोजता येण्याजोगा होता. आजही अशा आठवणी मनामध्ये अगदी ताजातवान्या आहेत. अशा आठवणी आठवल्या की मन फिरून एकदा ताजेतवाने आणि अल्लड होते.

आम्हाला नाईक नावाचे सर होते. एकदम कडक शिस्तीचे होते. वर्गात मुलांच्या बोलण्याचा आवाज त्यांना अजिबात सहन होत नसे. आम्हाला शिकवून झाले की, आम्हाला अभ्यास देऊन ते पेपर वाचायला बसत. ते तोंडासमोर पेपर उघडून वाचायला बसले, की आम्हाला हळू आवाजात खाणाखुणा करून बोलायची भारी हुक्की येई. अशा वेळी ते नाईक सर ताबतोब पेपर बाजूला करून आम्हाला डोळे मोठे करून ओरडत असत. किंवा खडू बरोबर नेम  धरून मारत असत. आम्हाला कळत नसे, की हे सर तर तोंडासमोर पेपर धरून वाचत आहेत, आणि आम्ही काय करतो, ते त्यांना कसे समजते. हा गहन प्रश्न आम्हाला नेहमीच सतवायचा. एके दिवशी ते नाईक सर पेपर टेबलावर विसरून गेले. तेव्हा तो पेपर उघडून बघितला तर प्रत्येक पानावर दोन तीन मोठी भोके पाडलेली होती. सरांची ही भारी आयडिया पाहून आम्हाला पडलेले कोडे लगेच सुटले. आम्ही तेव्हा खूप हसलो होतो.

शाळेच्या वर्षाअखेरीस परीक्षा संपल्या की समस्त सर्व वर्गातील मुलांना शिस्तीत रांगेत उभे करून कालिंगडाची फोड, वाटलेली डाळ आणि ग्लासभरून पन्हे दिले जायचे. ही कालिंगडाची फोड, वाटलेली डाळ आणि पन्हे या त्रिवेणी संगमाची चव आम्ही दरवर्षी घ्यायचो. दहावी पास झाल्यावर आमचा हा शिरस्ता सुटला. पण या त्रिवेणी संगमाची चव आजही माझ्याच काय तर समस्त बालमोहनकारांच्या जिभेवर आहे. गरमागरम वाटलेली हरभऱ्याची डाळ हातावर घेऊन ती आंबट तिखट डाळ  मिटक्या मारत खाताना आणि त्यावर मस्तपैकी थंडगार मधुर चवीचे कैरीचे थंडगार पन्हे पिताना जो आनंद होई, तो आनंद, ती चव पंचतारांकित हॉटेलच्या जेवणालासुद्धा नाही... शाळकरी मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात उभे राहून खाल्लेली ती वाटलेली डाळ, कालिंगडाची फोड, आणि थंडगार पन्हे प्यायल्यावर ती चव जिभेवर कित्येक तास रेंगाळत असे. आता हे सर्व लिहितानाही मला तो क्षण तो जसाच्या तसाच आठवत आहे. आणि ती चवही!!

शाळेच्या दुसर्‍या मजल्यावर असलेले कॅंटीन संजू नावाचा मुलगा चालवायचा. या कॅंटीनमधले गरमागरम  बटाटे वडे ज्याने ज्याने खाल्ले, तो या बटाटे वड्यांचा शौकीन झालाच! शनिवारी सकाळची शाळा असल्याने बहुतेक करून खाऊचा डबा घरातून बरेच विद्यार्थी आणत नसत. अशा वेळी कॅंटीनमधून हे गरमागरम बटाटे वडे खायची गम्मत काही औरच होती. त्यासोबत मिळणारी लसणाची चटणी या वड्यांची रुच द्विगुणीत करत असे. बटाटे वड्यांसोबत गरमागरम साबुदाणा वडा, डाळ वडा जर खाल्ला, तर त्या काळी अगदी धन्य झाल्यासारखे वाटायचे. दहावी झाल्यावर शाळा सुटली तरी कधी तरी या कॅंटीनमध्ये जाऊन गरमागरम बटाटे वडे खायची आपली हौस मीच नव्हे तर कित्येक बालमोहनकारांनी पूर्ण केली असेल.

शाळा सुटल्यावर एप्रिल मे महिन्यात शाळेच्या बाहेर दुकानात एक बुवा नावाचा माणूस बसायचा. त्याच्याकडे गाभुळलेली चिंच तसेच कैरीच्या फोडी व त्यावर मीठ मसाला लावून  मिळत असे. याच्या जोडीला कच्ची बडिशेपेचे तुरेही मिळत असत. हे सर्व चटकमटक खाणे म्हणजे स्वर्गसुख! शाळा सुटली की या बुवाकडे एकच तौबा गर्दी उसळायची. कागदाच्या तुकड्यावर मिळणारी ती मीठ मसाला लावलेली अर्धवट पिकलेली कैरी स्स स्स असा आवाज करून खाल्ली, की रसना अगदी तृप्त होत असे.

अशा अनेक आठवणी माझ्या रेशीम लडीत मर्मबंधातली ठेव म्हणून मी जपल्या आहेत. जेव्हा ही लडी मी उघडते, तेव्हा त्यातील एकेक मोती ओघळत जातो आणि मन परतून एकदा लहान होऊन जाते !!