खुनाच्या आरोपाखालील कैद्याला ‘स्वातंत्र्य’

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज मुक्तता : २०१८ मध्ये केला होता सहकाऱ्याचा खून


15th August 2022, 12:02 am
खुनाच्या आरोपाखालील कैद्याला ‘स्वातंत्र्य’

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून किरकोळ गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या पण, चांगले वर्तन असणाऱ्या कैद्यांची शिक्षा माफ करून त्यांना मुक्त करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली होती. त्यानुसार, सोमवार १५ ऑगस्ट रोजी दिनेश गौड (२५, मूळ ओडिशा) या कैद्याची सुटका करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने विशेष शिक्षा माफी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत तुरुंगातील शिस्त आणि कैद्यांमध्ये चांगले वर्तन सुनिश्चित करणे आणि त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती बदलून त्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनण्यास प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेनुसार, मागील तीन वर्षांत ज्या कैद्यांनी चांगले वर्तन केले आहे, त्यांची सुटका करण्यास सांगितले आहे. एकूण शिक्षेच्या कालावधीच्या दोन तृतियांश (६६ टक्के) पूर्ण केलेल्या कैद्यांनाही योजनेचा लाभ देण्यात आला आहे. याशिवाय कारावासाची मुदत पूर्ण होऊनही दंडाची रक्कम जमा न केल्याने तुरुंगात असलेल्या गरीब कैद्यांची, तसेच ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला (ज्यांनी ५० टक्के शिक्षा भोगली आहे.), ६० वर्षांवरील पुरुष व ७० टक्क्यांहून अधिक अपंग असलेले आणि गंभीर आजारी असलेल्या कैद्यांची सुटका १५ ऑगस्ट २०२२, २६ जानेवारी २०२३ आणि १५ ऑगस्ट २०२३ रोजी अशा तीन टप्प्यांत कैद्यांना मुक्त करण्यात येणार आहे. त्यानुसार, यंदा दिनेश गौड याची सुटका करण्यात येणार आहे.
कैदी दिनेश गौडाने त्याच्या साथीदाराचा खून केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी ३ आॅगस्ट २०१८ रोजी मडगाव येथील दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर या प्रकरणी सुनावणी घेतली असता, विधी सेवा अंतर्गत अॅड. अमेय प्रभुदेसाई यांनी बाजू मांडून खून करण्याचा हेतू नसल्याचा दावा केला. या युक्तिवादाचा तसेच इतर पुराव्याची दखल घेऊन तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजया आंब्रे यांनी कैदी दिनेश गौड याला दोषी ठरवून सदोष मनुष्यवध प्रकरणी २७ डिसेंबर २०१८ रोजी पाच वर्षे सात महिने आणि २० दिवसांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तसेच त्या दिवशी कैदी दिनेश याने सात महिने आणि २० दिवस कारावास भोगल्यामुळे तो कालावधी माफ केला होता. त्यानंतर वरील योजनेअंतर्गत कैदी दिनेश गौड याचा विचार करण्यात आला. त्यावेळी २६ एप्रिल २०२२ रोजी त्याने ४ वर्षे १५ दिवस कारावास भोगला होता. तसेच ३० एप्रिल २०२२ रोजी त्याला १ वर्ष २ महिने आणि पाच दिवस सवलत मिळाली होती.

‘‍जेवण कोणी करावे’ या कारणामुळे केला खून
कैदी दिनेश गौड याने त्याचा साथीदार चंद्रा गौड याचा ‘जेवण कोणी करावे’ या क्षुल्लक कारणामुळे १० मे २०१८ रोजी मध्यरात्री दारूच्या नशेत हातोडी डोक्यावर मारून खून केला होता. या प्रकरणी कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक फिलोमेना कोस्टा यांनी ११ मे २०१८ रोजी कैदी दिनेश गौड याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती.
'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत, भारत सरकार महिला आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ट्रान्सजेंडर दोषींची शिक्षा कमी करण्याचा विचार करत आहे. मात्र, ज्यांचे वर्तन चांगले आहे त्यांना सरकारचा हा आशीर्वाद मिळणार आहे. ६० वर्षांवरील पुरुष कैदी आणि अर्ध्यापेक्षा जास्त शिक्षा पूर्ण केलेल्या अपंग कैद्यांनाही सरकार या योजनेचा लाभ देणार आहे.