उद्याच्या भारतासाठी...

आपल्याला असा भारत घडवायचा आहे, ज्याची मुळे प्राचीन परंपरा आणि वारशांमध्ये रुजलेली असतील आणि जो आधुनिकतेच्या आकाशात अनंतकाळपर्यंत पसरेल.

Story: प्रासंगिक | डॉ. संजय द्विवेदी |
13th August 2022, 11:27 pm
उद्याच्या भारतासाठी...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नव्या भारतासाठी सेवा आणि त्यागाचा हाच अमृतविचार उमलत आहे. या त्यागाच्या आणि कर्तव्याच्या जोरावर कोट्यवधी देशवासीय सुवर्ण भारताचा पाया रचत आहेत. आपली स्वप्ने आणि राष्ट्राची स्वप्ने वेगळी नाहीत. आपले व्यक्तिगत आणि राष्ट्रीय यश वेगवेगळे नाही. राष्ट्राच्या प्रगतीत आपली प्रगती आहे. राष्ट्र आपल्यामुळे अस्तित्वात आहे आणि आपण राष्ट्रामुळे अस्तित्वात आहोत ही भावना, ही जाणीव भारतातील लोकांची नवीन भारत घडविण्यामागील मोठी शक्ती बनत आहे. आज देश जे काही करत आहे, त्यात प्रत्येकाच्या प्रयत्नांचा सहभाग आहे. सबका साथ, सबका विश्वास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा या देशाचा मूलमंत्र बनत चालला आहे. आज आपण अशी व्यवस्था निर्माण करत आहोत, ज्यामध्ये भेदभावाला थारा नाही. आपण अशा भारताचा उदय पाहत आहोत, ज्याची विचारसरणी आणि दृष्टिकोन नवीन आहे. निर्णय प्रगतिशील आहेत. 

भारताचे सर्वांत मोठे सामर्थ्य असे आहे की, वेळ कशीही आली आणि कितीही अंधःकार दाटून आला तरी भारत आपला मूळ स्वभाव कायम ठेवतो. आपला जुना इतिहास याचा साक्षीदार आहे. जेव्हा जग अंधकारात बुडालेले होते, स्त्रियांबद्दलच्या जुन्या विचारसरणीत अडकले होते, तेव्हा भारत स्त्रीशक्तीची देवीच्या रूपात पूजा करीत असे. आमच्या येथे गार्गी, मैत्रेयी, अनसूया, अरुंधती, मदालसा या विदुषी समाजाला ज्ञान देत असत. मध्ययुगीन कठीण काळातही या देशात पन्नाध्याय, मीराबाई यांच्यासारख्या थोर स्त्रिया होत्या आणि अमृत महोत्सवात देशाला स्वातंत्र्यलढ्याचा जो इतिहास स्मरतो आहे, त्यातही थोर स्त्रियांनी बलिदान दिले आहे. राणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, वीरांगना झलकारीबाईंपासून अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत असंख्य महिलांनी सामाजिक क्षेत्रात भारताची अस्मिता जपली. लाखो स्वातंत्र्यसैनिकांसह स्वातंत्र्यलढ्यातील महिला शक्तीचे हे योगदान आज देशाच्या स्मरणात आहे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण सारेजण करीत आहोत. सैनिकी शाळेत शिक्षण घेण्याचे मुलींचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. आता देशातील कोणतीही मुलगी सैन्यात जाऊन देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाच्या जबाबदार्‍या घेऊ शकते. महिलांचे आयुष्य आणि करिअर दोन्ही एकत्रितपणे जपण्यासाठी मातृत्वरजा वाढविण्यासारखे निर्णय घेण्यात आले आहेत. देशातील लोकशाहीत महिलांचा सहभागही वाढत आहे. २०१९ च्या निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक संख्येने मतदान केले. देशातील सरकारमध्ये महिला मंत्री मोठ्या जबाबदार्‍या सांभाळत आहेत. सर्वांत अभिमानास्पद गोष्ट अशी की, आता समाजच या बदलाचे नेतृत्व करीत आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेच्या यशामुळे देशातील लिंग गुणोत्तरही वर्षानंतर सुधारल्याचे अलीकडील आकडेवारीवरून दिसून आले आहे. हे बदल नवा भारत कसा असेल, किती शक्तिशाली असेल, याचे स्पष्ट संकेत आहेत.

आपली संस्कृती आणि आपली मूल्ये आपल्याला जिवंत ठेवायची आहेत. आपले अध्यात्म, आपली विविधता जपून ती संवर्धित करायची आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या यंत्रणांचे सातत्याने आधुनिकीकरण करावे लागेल. आज भारत शेतकर्‍यांना समृद्ध आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीच्या दिशेने प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातही जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आज स्वच्छ ऊर्जेसाठी अनेक पर्याय विकसित होत आहेत. याबाबत जनजागृतीसाठी मोठ्या मोहिमेची गरज आहे. आपण एकत्र येऊन आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देऊ शकतो. स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देऊन व्होकल फॉर लोकल या मोहिमेला मदत करू शकतो. 

हा अमृतकाळ झोपेत राहून स्वप्न पाहण्याचा नाही, तर जागे होऊन आपली स्वप्ने, संकल्प पूर्ण करण्याचा आहे. येणारी २५ वर्षे कष्टाची, २५ वर्षे त्यागाची, परिश्रमाच्या पराकाष्ठेची आणि तपश्चर्येची आहेत. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत आपल्या समाजाने जे गमावले ते परत मिळवण्यासाठी हा २५ वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात आपले लक्ष भविष्याकडे लागले पाहिजे. आपल्या समाजात अद्भुत क्षमता आहेत. हा असा समाज आहे, ज्यात जुन्याप्रमाणेच नित्य नवीन व्यवस्था आहे. मात्र, कालांतराने व्यक्तीमध्ये तसेच समाजात आणि देशातही काही दुष्प्रवृत्ती शिरतात, हे कोणीही नाकारू शकत नाही. ज्यांना जागृत राहिल्याने या वाईट गोष्टी कळतात ते या वाईटापासून दूर राहण्यात यशस्वी होतात. असे लोक त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात. आपल्या समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात विशालताही आहे, वैविध्यही आहे आणि हजारो वर्षांच्या प्रवासाचा अनुभवही आहे. त्यामुळे बदलत्या युगाशी जुळवून घेण्याची एक वेगळीच ताकद आपल्या समाजात आहे. आपल्या समाजाची सर्वांत मोठी ताकद अशी की, समाज सुधारणारे वेळोवेळी समाजातूनच जन्म घेतात आणि समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींवर प्रहार करतात. समाजसुधारणेच्या सुरुवातीच्या काळात अशा लोकांना अनेकदा विरोधाला, कधी-कधी तर तिरस्कारालाही सामोरे जावे लागते, हेही आपण पाहिले आहे. अशी परिपूर्ण माणसे समाजसुधारणेच्या कार्यापासून मागे हटत नाहीत. ते अविचल राहतात. कालांतराने समाजदेखील त्यांना ओळखतो, त्यांचा आदर करतो आणि त्यांची शिकवण आत्मसात करतो. 

आज भारतात डिजिटल गव्हर्नन्ससाठी सर्वोत्तम पायाभूत सुविधा आहेत. जनधन, मोबाईल आणि आधार या त्रिशक्तीचा देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना सर्वाधिक फायदा झाला आहे. याद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा आणि त्यातून आणलेल्या पारदर्शकतेमुळे देशातील कोट्यवधी कुटुंबांचे पैसे वाचले आहेत. आठ वर्षांपूर्वी इंटरनेट डेटासाठी जेवढे पैसे खर्च करावे लागत होते. त्यापेक्षा कितीतरी पट कमी किमतीत आज आणखी चांगली डेटा सुविधा उपलब्ध आहे. पूर्वी बिल भरण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी, तिकीट आरक्षणासाठी, बँकेशी संबंधित कामांसाठी अशा प्रत्येक सेवेसाठी कार्यालयात फेर्‍या माराव्या लागत होत्या. रेल्वे रिझर्व्हेशन करायचे असेल आणि ती व्यक्ती खेड्यात राहत असेल तर त्याचा दिवस खर्ची पडायचा. तो शहरात जायचा, बसच्या भाड्याचे शे-दीडशे रुपये खर्च करायचा आणि मग रेल्वे आरक्षणासाठी रांगेत थांबायचा. आज तो कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जातो आणि तिथूनच त्याचे काम होते. ई-संजीवनीसारख्या टेक्निकन्सल्टेशनच्या सेवेद्वारे आतापर्यंत ३० दशलक्षांहून अधिक लोकांनी घरी बसून त्यांच्या मोबाईलवरून सर्वोत्तम रुग्णालयातील सर्वोत्तम डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. जर त्यांना डॉक्टरांकडे जावे लागले असते तर किती अवघड गेले असते आणि किती खर्च आला असता, याची कल्पना सहज करता येते. पंतप्रधान स्वामित्व योजनेकडे शहरातील लोकांचे लक्ष फारसे गेले नाही. शहरांप्रमाणेच प्रथमच गावातील घरांचे मॅपिंग आणि गावकर्‍यांना डिजिटल कायदेशीर कागदपत्रे देण्याचे काम सुरू आहे. ड्रोनवरून गावागावात घरांचे मॅपिंग सुरू आहे. आता जनता दरबारातील सर्व त्रास थांबले असून, हे सर्व डिजिटल इंडियामुळे घडले आहे. डिजिटल इंडिया मोहिमेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. 

गेल्या आठ वर्षांत डिजिटल इंडियाने देशात जी क्षमता निर्माण केली आहे, त्यामुळे भारताला करोनाच्या जागतिक महामारीचा सामना करण्यास खूप मदत झाली आहे. जर डिजिटल इंडिया मोहीम नसती तर या सर्वांत मोठ्या संकटात आपण काय करू शकलो असतो? देशातील कोट्यवधी महिला, शेतकरी, मजूर यांच्या बँक खात्यांमध्ये एका क्लिकवर हजारो कोटी रुपये ट्रान्सफर झाले. वन नेशन-वन रेशन कार्डच्या मदतीने ८० कोटींहून अधिक देशवासियांना मोफत रेशन सुनिश्चित करण्यात आले. हा तंत्रज्ञानाचाच चमत्कार आहे. भारताने जगातील सर्वांत मोठा आणि सर्वांत प्रभावशाली कोविड लसीकरण आणि रिलीफ कार्यक्रम सुरू केला. आरोग्य सेतू आणि कोविन हे असे प्लॅटफॉर्म आहेत, ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २०० कोटी लसींचे डोस दिले गेले आहेत. आजही जगात लसीचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे यावर चर्चा होते आणि बरेच दिवस जातात. भारतात एखादी व्यक्ती लस घेऊन बाहेर येते आणि प्रमाणपत्र तिला तिच्या मोबाईलवरच दिसते. डिजिटल इंडिया भविष्यातही भारताच्या नव्या अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया बनावा म्हणून आज विविध प्रयत्न केले जात आहेत. आज एआय, ब्लॉक चेन, एआर-व्हीआर, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन, रोबोटिक्स, ग्रीन एनर्जी यासारख्या अनेक नव्या उद्योगांसाठी १०० हून अधिक कौशल्य विकास अभ्यासक्रम चालविले जात आहेत. येत्या ४-५ वर्षांत भविष्यातील कौशल्यांसाठी १४-१५ लाख तरुणांना पुन्हा कुशल आणि उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतमंदिरात आपल्या राष्ट्रीय संकल्पाची पूर्तता आपल्या कृतीतून ठरेल. या क्रिया प्रत्येक स्तरावर, प्रत्येक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अमृत महोत्सवाचे बलस्थान हे लोकांचे मन आणि लोकांचे समर्पण हीच आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने भारताची वाटचाल आगामी काळात आणखी वेगाने सुवर्णमयी भारताच्या दिशेने होईल.