ज्येष्ठांसोबत साजरा केला आझादी का अमृत महोत्सव

कोलवाळ येथील कार्यक्रमात मंत्री हळर्णकर, पोलीस महासंचालकांची उपस्थिती


13th August 2022, 11:02 pm
ज्येष्ठांसोबत साजरा केला आझादी का अमृत महोत्सव

कोलवाळ येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसोबत झेंडा फडकवताना मंत्री नीळकंठ हळर्णकर, पोलीस महासंचालक जसपाल सिंग व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ज्येष्ठ नागरिकांसोबत देशाचा आझादी का अमृत महोत्सव साजरा केला. यानिमित्त गोवा पोलिसांनी कोलवाळ येथे खुल्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, उपमहानिरीक्षक ओमवीर सिंग, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक जिवबा दळवी तसेच ज्येष्ठ नागरिक प्रकाश सांगोडकर, दत्ताराम परब हे व्यासपीठावर उपस्थित होते. शिवाय कोलवाळ, म्हापसा व हणजूण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हजर होते.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ज्येष्ठांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी होती. आपत्कालिन प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना थेट पोलिसांशी संपर्क साधता यावा, यासाठी पोलीस अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक असलेल्या पत्रकाचे वितरण केले गेले. ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना विशेष टी-शर्ट व तिरंगा झेंड्याचे वितरणही करण्यात आले.
मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी निस्वार्थपणे सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या कामाची स्तुती केली. हल्लीच्या काळात गंभीर गुन्ह्यांचा गोवा पोलिसांनी यशस्वीरीत्या छडा लावल्याबद्दल त्यांची पाठ थोपटली. लोकांनी देशाच्या आझादी का अमृत महोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. याच अनुषंगाने गोवा पोलिसांनी समाधान हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक पोलीस स्थानकांत वरिष्ठ पोलीस अधिकारी हे ज्येष्ठांच्या तक्रारी या उपक्रमांतर्गत ऐकतील. _ जसपाल सिंह, पोलीस महासंचालक