सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने

Story: प्रतिनिध। गोवन वार्ता |
06th August 2022, 12:32 am
सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने

पणजी : भाजप सरकार ईडी आणि पोलिसांचा वापर करुन आंदोलनकर्त्यांना अटक करत आहे. सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. भाजपने काँग्रेस नेत्यांना ईडी मार्फत सुरू केलेल्या सतावणुकीविरोधात तसेच महागाईविरोधात काँग्रेसने शुक्रवारी पणजीत निदर्शने केली. यावेळी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

सरकारला विरोधक नको आहेत आणि त्यांना संपविण्याचे काम मोदी सरकार करत आहे. आंदोलने केल्यास अटक केली जाते. हे भाजप सरकार सर्वसामान्य लाेकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जनता त्यांना योग्यवेळी धडा शिकविणार आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले.

भाजप सरकारने सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. काँग्रेस सरकारवेळी सामान्य जनता तसेच व्यावसायिक आनंदात होते. मात्र, भाजप सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठल्याने आणि सरकारच्या जनताविरोधी योजनांमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. लोकांनी काही मागण्या केल्यास भाजप सरकार जनतेवरच कारवाई करते, असे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले.

काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक व सुटका

आंदाेलनात सहभागी झालेल्या नेत्यांना पाेलिसांनी अटक करुन नंतर सोडून दिले. देशात सर्वत्र काँग्रेस पक्षाने महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ योजनेविरोधात आंदोलने केली असून पणजीतही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनात सहभागी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महिला अध्यक्ष बिना नाईक व इतर कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी अटक करुन सुटका केली.