पाण्यासोबत देवमूर्ती गिळणाऱ्याला जीवदान !

बेळगाव येथील भक्ताची मृत्यूच्या दाढेतून सुटका


23rd June 2022, 11:58 pm
पाण्यासोबत देवमूर्ती गिळणाऱ्याला जीवदान !

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

बेळगाव : देवाची अतिभक्ती भक्ताच्याच जीवावर बेतण्याची वेळ आली होती; पण ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच एकप्रकार नुकताच बेळगाव शहरात घडला. देवभक्तीत तल्लीन झालेल्या एका भक्ताने बाळकृष्णाची पितळेची मूर्ती गिळली. त्यामुळे मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या या भक्ताला अखेर बेळगाव येथील केएलई इस्पितळाच्या डॉक्टरांनी गुरुवारी सहीसलामत बाहेर काढले.      

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव परिसरातील ४५ वर्षीय एक तरुण रोज रात्री देव पाण्यात ठेवायचा आणि सकाळी उठून ते पाणी प्राशन करायचा. दोन दिवसांपूर्वी देव ठेवलेले पाणी पिताना त्या पाण्यातून मूर्ती बाहेर काढण्यास तो विसरला. पाण्यासोबत बाळकृष्णाची पितळेची लहान मूर्तीही घशात गेली. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्या तरुणाला तत्काळ स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढल्यानंतर अन्ननलिकेत बाळकृष्णाची मूर्ती अडकल्याचे दिसून आले.

स्थानिक डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्याला बेळगाव येथील केएलई इस्पितळात पाठवले. त्यानुसार तो इस्पितळात दाखल झाला. तेथील डॉ. प्रीती हजारे, डॉ. विनिता मेटगुडमठ आणि डॉ. चैतन्य कामत यांच्या वैद्यकीय पथकाने एन्डोस्कोपीच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या अन्ननलिकेत अडकलेली मूर्ती बाहेर काढली आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.