‘टिटोज’ विकण्याचा निर्णय रद्द!

शेअर्स विक्रीची मालकांकडून घोषणा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th May 2022, 01:14 Hrs
‘टिटोज’ विकण्याचा निर्णय रद्द!

पणजी : गोव्यातील जगप्रसिद्ध क्लब म्हणून नावलौकिक असलेला बागा (कळंगूट) येथील ‘टिटो क्लब’ विकण्याचा निर्णय क्लबचे मालक रिकार्डो जोजफ डिसोझा ऊर्फ रिकी यांनी जून २०२१ मध्ये घेतला होता. मात्र, लोकाग्रहास्तव हा क्लब विकला जाणार नाही. तो निर्णय रद्द केला आहे, अशी माहिती रिकी यांनी सोमवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली. इतकेच नव्हे तर, टिटोज उद्योग समूह आपले शेअर्स आता बाजारात विक्रीसाठी आणणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यापुढे मी माझा जास्तीत जास्त वेळ विदेशात घालवणार आहे. कारण तिथे उद्योगधंद्याच्या मोठ्या संधी आहेत. तेथील वातावरणही व्यवसायासाठी पूरक आहे. बहुतेक मी पोर्तुगालमध्ये जाणार आहे. याची प्रक्रिया पुढील महिनाभरात पूर्ण होईल, असेही रिकार्डो यांनी यावेळी सांगितले.
आम्ही टिटोजचे शेअर्स लोकांसाठी उपलब्ध करणार आहोत. ती प्रक्रिया सुरू आहे. गोव्यातील लोकांनी एकत्र येऊन टिटोजचा कारभार हाती घेतला पाहिजे. परप्रांतीय मोठ्या प्रमाणात टिटोजचे शेअर्स विकत घेण्यासाठी तयार आहेत. पण माझे पहिले प्राधान्य गोवेकरांसाठी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज गुजराती लोक कशा तऱ्हेने व्यवसाय वाढवतात, ते पहा. गोवेकरांनी टिटोजचे शेअर्स विकत घ्यावेत. या उद्योग समूहाचे भागीदार बनावे. एवढ्या मोठ्या ब्रँडचे मालक व्हावे आणि आमच्यासोबत त्यांनीही ग्लोबल व्हावे, असे आवाहन रिकी यांनी केले आहे.