किशोर नाईक गांवकर यांना विश्व संवाद केंद्राचा पुरस्कार

मडगाव येथे आज वितरण : पत्रकार भास्कर देसाई यांचाही गौरव


23rd May 2022, 12:04 am
किशोर नाईक गांवकर यांना विश्व संवाद केंद्राचा पुरस्कार

 किशोर नाईक गावकर, भास्कर देसाई

पणजी : ‘गोवन वार्ता लाईव्ह’चे संपादक किशोर नाईक गांवकर यांना विश्व संवाद केंद्र, गोवाचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार-२०२२’ जाहीर झाला आहे. तर, ज्येष्ठ पत्रकार भास्कर देसाई यांना ‘देवर्षी नारद विशेष कामगिरी पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे. सोमवार, २३ मे रोजी सायं. ६.३० वाजता मडगाव येथील रवींद्र भवन (ब्लॅक बॉक्स) येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
विश्व संवाद केंद्र, गोवा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवार संघटनेतील पत्रकारिता क्षेत्रात काम करणारी संस्था असून, या संस्थेमार्फत दरवर्षी देवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधून पत्रकारिता पुरस्कार दिले जातात. यंदा निवड समितीने किशोर नाईक गांवकर यांचे नाव ‘देवर्षी नारद पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कारा’साठी नक्की केले.
किशोर नाईक गांवकर हे अनेक वर्षे मुद्रित तसेच दृकश्राव्य माध्यमातून पत्रकारितेचे व्रत जपत आहेत. शोषित, वंचित, दीनांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. आपल्या सडेतोड कार्यशैलीतून त्यांनी गोमंतकीय पत्रकारितेत स्वतंत्र नाममुद्रा उमटवली आहे. ज्येष्ठ पत्रकार भास्कर देसाई यांनीही पत्रकारितेच्या माध्यमातून दक्षिण गोव्यात कार्य केले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व संवाद केंद्र, पणजीचे संयोजक श्रीहरी आठल्ये यांनी केले आहे.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, तसेच मुख्य वक्ते म्हणून जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक प्रसाद काथे उपस्थित रहाणार आहेत.