प्रदर्शनीय सामन्यात जीसीएचा रोमहर्षक विजय

अटीतटीच्या लढतीत गोवा क्रीडा पत्रकार संघटनेवर मात


12th May 2022, 11:51 pm
प्रदर्शनीय सामन्यात जीसीएचा रोमहर्षक विजय

पणजी : परेश फडते व प्रकाश मयेकर यांच्या अभेद्य भागिदारीच्या जोरावर गोवा क्रिकेट संघटनेने (जीसीए) अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत गोवा क्रीडा पत्रकार संघटनेचा (एसजेएजी) पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना गोवा क्रीडा पत्रकार संघटनेने सर्व गडी गमावत १५ षटकांत ८१ अशी धावसंख्या उभारली. विल्यमन्सने १२ तर अनिरुद्ध राऊळने ९, संतोष कुबलने ७ धावा जोडल्या. जीसीएकडून विजय खोलमकरने ३, परेश फडतेने २, तर विजय कुचडकर, प्रकाश मयेकर, सिद्धेश , आनंद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. जीसीए संघाकडून सुशांत नाईकने शानदार यष्टिरक्षण केले.  

प्रत्युत्तरात खेळताना जीसीएने लक्ष्य ५ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. सुरेश महादेवन (९) व रुपेश (१२) हे माघारी परतल्यानंतर एकवेळ गोवा क्रीडा पत्रकार संघटनेने सूत्रबद्ध गोलंदाजी करीत सामना आपल्या बाजूने वळवला होता. परंतु त्यानंतर परेश फडते (नाबाद २७) आणि प्रकाश मयेकर (नाबाद १४) यांनी चौथ्या विकेटसाठी अभेद्य भागिदारी करीत जीसीएचा विजय साकारला. एसजेएजीकडून महेश गावकरने ३ तर विजयने २ गडी बाद केले. 

बक्षीस वितरण सोहळ्याला पणजी जिमखानाचे सदस्य तथा माजी जकात अधिकारी महेश देसाई, जीसीएचे खजिनदार परेश फडते, प्रशिक्षक संचालक प्रकाश मयेकर, एसजेएजीचे अध्यक्ष महेश गावकर आदींची उपस्थिती होती. विजयी व उपविजयी ठरलेल्या संघांना चषक प्रदान करण्यात आले. तर एसजीएजीकडून जीसीए व पणजी जिमखाना यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. रोहन श्रीवास्तव, अनिरुद्ध राऊळ, राजतिलक नाईक, लौकिक शिलकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.