सचिव अर्जुन वेळीप यांनी याचिका घेतली मागे

पंचायत संचालनालयाविरोधात होती याचिका

|
19th January 2022, 10:27 Hrs
सचिव अर्जुन वेळीप यांनी याचिका घेतली मागे

पणजी : फातर्पा-किठ्ठल पंचायतीचे माजी सचिव अर्जुन वेळीप यांनी दिलेला राजीनामा पंचायत संचालनालयाने स्वीकारला नसल्यामुळे त्यांनी या विषयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. ही आव्हान याचिका वेळीप यांनी बुधवारी मागे घेतली. त्यामुळे खंडपीठाने संबंधित याचिका निकालात काढली आहे.
अर्जुन वेळीप यांनी ५ जुलै २०२१ रोजी सचिवपदाचा राजीनामा पंचायत संचालनालयाकडे पाठविला होते. हा अर्ज स्वीकारला नसल्यामुळे वेळीप यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले. शिवाय याप्रकरणी वेळीप यांचा राजीनामा आल्यानंतर पंचायत संचालनालयाने याबाबत आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू केल्याचे म्हटले होते. त्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्याचा राजीनामा स्वीकारण्याअगोदर दक्षता खात्याची मंजुरी घेणे अनिवार्य असल्यामुळे याबाबत दक्षता खात्याकडून माहिती मागवली होती. त्यात अर्जुन वेळीप यांच्यासह इतर ९ जणांविरोधात २०१४ मध्ये एसीबीत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती संचालनालयाच्या वतीने खंडपीठात देण्यात आली. तसेच त्या गुन्ह्याची चौकशी सुरू असल्यामुळे त्यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे संचालक सिद्धी हळर्णकर यांनी नमूद केले. त्यानंतर खंडपीठाने याचिकेची पुढील सुनावणी बुधवारी ठेवली होती.
बुधवारी याचिकेची सुनावणी सुरू झाली असता, वेळीप यांच्यातर्फे वकिलांनी संबंधित याचिका मागे घेत असल्याची माहिती खंडपीठात सादर केली. याची दखल घेऊन खंडपीठाने याचिका निकालात काढली.