शत्रूचा वेध ! एका मिनिटात ६०० गोळ्या...

- एके-२०३ रायफल्ससाठी भारताचा रशियासोबत ५,१०० कोटींचा करार

Story: दिल्ली : |
07th December 2021, 01:20 am
शत्रूचा वेध ! एका मिनिटात ६०० गोळ्या...

दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यात सोमवारी भारत आणि रशिया या देशांमध्ये एके-२०३ रायफल संदर्भात तब्बल ५,१०० कोटींच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. जगातील सर्वांत घातक आणि यशस्वी ठरलेल्या एके-४७ या रायफलचे आधुनिक स्वरूप म्हणजे एके-२०३! या करारा अंतर्गत भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांसाठी अमेठीच्या कारखान्यात सहा लाख रायफल्स बनवल्या जाणार आहेत. या रायफल्स सैन्यात स्वदेशी बनावटीच्या 'इन्सास रायफल'ची जागा घेतील.
रशियन कंपनीच्या सहकार्याने एके २०३ रायफल्सची निर्मिती भारतातच अमेठीमध्ये केली जाणार आहे. लष्करात कार्यरत मेजर जनरल या प्रकल्पाचे प्रमुख असतील. एके २०३ ही रायफल एके ४७ रायफलची प्रगत आवृत्ती आहे. या रायफलचे जुने नाव ‘एके १०३ एम’ असे होते. पण हे नाव बदलून एके २०३ करण्यात आले.
यापूर्वी इन्सास रायफल डीआरडीओकडून बनवण्यात आली. १९९० च्या दशकात 'इन्सास रायफल' लष्करात दाखल झाल्या. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे भारतीय जवान दीर्घकाळापासून 'इन्सास रायफल'च्या वापरात येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करत होते. त्यामुळे इन्सास रायफलला पर्याय शोधणे गरजेचे ठरले.
फायरिंगच्या वेळी रायफल जॅमिंग, तीन राउंडनंतर रायफल स्वयंचलित मोडमध्ये जाणे आणि युद्धादरम्यान रायफलधारी जवानाच्या डोळ्यांत तेल उडणे अशा अनेक समस्या या रायफलच्या वापरात जाणवत होत्या. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान सैनिकांनी इन्सासच्या जॅमिंगमुळे मॅगझिन्स तुटल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या समस्यांमुळे जवानांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी इन्सास बाजूला टाकून एके ४७ हाती घेतल्या होत्या. दुसरीकडे, सीआरपीएफनेही नक्षलवादी प्रभावित भागात एके ४७ रायफल्सचा वापर सुरू केला.
'इन्सास रायफल्स'ची क्षमता ४०० मीटरच्या टप्प्यात येते. तसेच मॅगझीनची क्षमताही एका वेळी फक्त वीस राउंड फायर करण्याची आहे. किती वेळा गोळीबार झाला आणि किती गोळ्या बाकी आहेत हेदेखील सहजच मोजता येऊ शकते. 'इन्सास' या आकारमानाने मोठ्या आणि वजनानेही जड आहेत. मॅगझिन आणि किर्चशिवाय या रायफलचे वजन ४.१५ किलो आहे. त्यामुळे त्या सतत सोबत बाळगणे आणि वाहून नेणेही थोडे जिकिरीचे होऊन बसते.
‘एके-२०३’ची वैशिष्ट्ये अशी...
* एके २०३ च्या मॅगझीनमध्ये ३० गोळ्या येतील. ४०० मीटरच्या टप्प्यातील शत्रूला ही रायफल सहजच टीपू शकेल. ही रायफल 'इन्सास रायफल'पेक्षा वजनाने हलकी आणि आकारमानाने लहान आहे.
* या रायफलचे वजन ४ किलो असेल. तसेच यात 'पिकेटिनी रेल'चीही सुविधा आहे (नाईट व्हिजन डिव्हाईस किंवा दुर्बिण बसवण्यासाठी रायफलच्या वरच्या भागात एक प्लॅटफॉर्म बसवलेला आहे).
* 'इन्सास'मध्ये ५.५६ X ४५ MM कॅलिबर बुलेट वापरल्या जातात तर एके २०३ या रायफलमध्ये ७.६२ X ३९ MM बुलेट फायर केल्या जातील. या रायफलच्या मदतीने एका मिनिटात ६०० गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. म्हणजे एका सेकंदात दहा गोळ्या झाडल्या जातील. ही रायफल ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक अशा दोन्ही पद्धतीने वापरल्या जाऊ शकतील.
* या रायफलची खासियत म्हणजे, तीव्र थंडी, उन्हाळा किंवा पाऊस अशा कोणत्याही हवामानात ती जाम न होता काम करू शकेल.
* एके ४७ या रायफलचा वापर जगातील जवळपास ५० देश करत आहेत. तर जगातील ३० हून अधिक देशांनी एके २०३ ही रायफल बनवण्याचा परवाना रशियाकडून घेतला आहे.