कंडक्टर : बस की जान!

आमच्या इथे एक कंडक्टर होता जो रोज मुली व महिलांशी फ्लर्ट करत असे. मुलींना सर्व काही विचारायचा - आज उशीर झाला? सावकाश ये, पळू नकोस, पडशील, मी थांबतो तुझ्यासाठी. तेच जर मुलाला उशीर झाला तर त्याला शिव्या द्यायचा.

Story: आदित्यच्या चष्मातून | आदित्य सिनाय भा |
04th December 2021, 11:39 Hrs
कंडक्टर : बस की जान!

लहानपणी  पायलट बनण्यापासून ते कंडक्टर बनण्यापर्यंत सर्वांचे स्वप्न असते. नंतर ही सगळी स्वप्ने एका बाजूला राहतात व आपण काही भलतंच करून जातो. वेगवेगळ्या नटयांसोबत नाचायला मिळणार म्हणून काही जण अभिनेताही बनायचे स्वप्न बघतात. मग लहानपणात आपण ऐकतो फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मजाच मजा. नंतर बारावीपर्यंत अभ्यास कर, मग मजाच मजा. नंतर फक्त डिग्री पूर्ण कर, नंतर मजाच मजा. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कर, मग मजाच मजा. नंतर एक जॉब घे, मग मजाच मजा. असे ऐकता ऐकता आयुष्य  कधी संपते कळतच नाही. सध्याच्या काळात सोशल मीडिया व ट्रॅफिक जॅम ह्या दोन्हीतून उरलेला वेळ म्हणजेच आयुष्य आहे. कंडक्टर दोन प्रकारचे असतात हे आपण शाळेत विज्ञानामध्ये शिकलोय - १) गुड कंडक्टर २) बॅड कंडक्टर. ते जरी विद्युतच्या संदर्भात असले, तरी आमच्या बस कंडक्टरवरसुद्धा लागू होते. बस कंडक्टरसुद्धा अशाच दोन प्रकारचे असतात. काही वेळा बस खूप सावकाश जाणारी मिळते. पण कंडक्टर चांगला असला तर प्रवास हसतमुखाने होतो. मे २०१६ ची गोष्ट. कोल्हापूरहून पणजीला येत होतो. विश्रांतीसाठी थांबून जेव्हा बस सुरू झाली तेव्हा एक बाई ओरडली - अहो थांबा!

कंडक्टर म्हणाला - काय झाले, कोण उतरलाय की काय?

ती - हो, माझा मुलगा.

कंडक्टर - लग्न झालेय का त्याचे?

ती - नाही.

कंटक्टर - मग विसरा, गेलाय तो पोरींच्या मागे!

हा संवाद ऐकून सर्वजण हसायला लागले. जर कुणी रागीट कंडक्टर असता, तर काही अपशब्द बोलला असता.

गोव्यात बहुतेक ठिकाणी प्रायव्हेट व सरकारी दोन्ही बसमध्ये चांगले व वाईट कंडक्टर आहेत. काही सीनियर कंडक्टर अजय देवगणप्रमाणे असतात, म्हणजे विमल खाणारे. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळी जेवणासोबत त्यांना व्हिस्की पाहिजेच असते. आताचे नवीन युवा कंडक्टर आहेत त्यांची शैली थोडी वेगळी आहे. त्यांना दुपारी बीयर, ब्रिझर किंवा कोकाकोलासुद्धा चालते. पण मासे, चिकन किंवा बिर्याणी हे एकदम ठरलेले. कंडक्टरला बघून मग ड्राईव्हरला पण इच्छा होते, पण तो पिऊ शकत नाही. तसा पिऊन तो बस अधिक चांगली चालवतो, पण रस्त्यात कुठे मामांनी आल्कोमीटर टाकला तर वाट लागणार ना!

कंडक्टर फ्लर्ट करण्यात प्रो असतात! म्हणजे प्रेमात पडलेला एखादा तरुणसुद्धा इतका जीव तोडून  प्रेम करणार नाही जितका कंडक्टर करतो. आमच्या इथे एक कंडक्टर होता जो रोज मुली व महिलांशी फ्लर्ट करत असे. मुलींना सर्व काही विचारायचा - आज उशीर झाला? सावकाश ये, पळू नकोस, पडशील, मी थांबतो तुझ्यासाठी. तेच जर मुलाला उशीर झाला तर त्याला शिव्या द्यायचा. मग मुलीपण कंडक्टर सोबत कमफर्ट झोन बघायच्या. त्यांना आवडतो असा कंडक्टर ज्या बसमध्ये असायचा त्याच बसमध्ये त्या जायच्या. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात कंडक्टरने काय केलंय माहीत नाही, पण अनेक सुंदर मुली कंडक्टर सोबत पळून गेल्या. तोच बिचारा दुसऱ्या मुलाने कितीही जरी मुलीला पिझ्झा-बर्गर खायला दिला, मुलींची मात्र फुकट यात्रा देणाऱ्या कंडक्टरलाच पसंती होती. बिचारी मुले मग केटीएम वगैरे घेऊन एकटेच फिरायचे. आमच्या इथे एक कंडक्टर रोज मुलींच्या कमरेला हात घालून बसमध्ये चढवायचा. साडी नेसलेल्या महिलांच्या कमरेला हात घालून तो कधी चिमटा पण काढायचा! बघा हे प्रो लेव्हल फ्लर्ट कंडक्टर.

एकदा राय-मडगाव येथे एक स्टॉपवरून बस सुरू व्हायची होती, इतक्यात एक महिला एक्टिव्हा घेऊन आली व इशारा करून बसला थांबायला सांगितले. कंडक्टरने बस थांबवायला सांगितली. सर्व लोकांना वाटले की ती महिला एक्टिव्हा पार्क करून आता बसमध्ये चढणार. पण पुढे काय? ती महिला आधीच बसमध्ये चढलेल्या दुसऱ्या महिलेला म्हणाली - "अगं ये, खाली उतर! मी पोहोचवते तुला" व ती तिला घेऊन गेली. दोन पॅसेंजर मिळणार ह्या आशेत थांबलेल्या कंडक्टरचा मिळालेला एक पॅसेंजरसुद्धा गेला. कधी-कधी कंडक्टर व ड्राईव्हर दोन्ही आपले रोल बदलतात, जर दोघांना बस चालवायला येते तर. काही ठिकाणी कंडक्टर जणू काही बस चालवायला येते का ते  बघायला फक्त बस स्टँडवर बस  रिव्हर्स करण्याचे काम करतो किंवा ठराविक अंतरापर्यंत तो चालवतो व मग ड्राईव्हरच चालवतो.

काही कंडक्टर उद्धट स्वभावाचे असतात. एकदा एक वृद्ध महिला सावकाश बसमध्ये चढत होती. कंडक्टर ओरडू लागला - "लवकर चढ, किती वेळ घेते. उगाच बसमध्ये येतात ह्या, घरी राहायला काय जाते?" मग वृद्ध महिला म्हणाली - "तुझ्या घरी वृद्ध आई-वडील नाहीत का? त्यांनाही तू असेच लवकर चढ म्हणणार का? वृद्धांशी कसे वागावे ते कळत नाही का तुला? गप बस, एक देणार गालावर तेव्हा सर्व मस्ती उतरणार." करोनाच्या आधी शिरोड्यात अमावस्येचा दिवशी खूप गर्दी असायची. लोक बसमध्ये चढायला-उतरायला उशीर करत होते. खूप वेळा फोनवर बोलतच राहत होते. एकद दिवस एक महिला फोनवर बोलता-बोलता बसमध्ये चढताना मध्येच थांबली -"अगं तू घरी पोहोचली का? किचनमध्ये सोलकढी करून ठेवलीय त्यातील सोले काढ व बाबू आला शाळेतून तर त्यालाही वाढ. दोघे जेवून घ्या." मग कंडक्टर ओरडला - "अगं सोले मी काढतो!! तू आधी वर चढ!"

हल्लीचीच गोष्ट! बोरी येथे टॉप कोल बस स्टॉपवर एक बस थांबलेली. तशी रिकामीच होती व एक बिगरगोमंतकीय कामगार आला. कंडक्टरने त्याला सांगितले - "पीछे से ऊपर चढ़ो!" व तो खराच पाठीमागच्या शिडीवरून वर गेला. मग कंडक्टर ओरडला - "आरे पीछे से चढ़ो मतलब दरवाज़े से रे, है मरे पीछे दरवाज़ा! तू मरे क्या करता है रे, सीधा ऊपर चढ़ा!" हा फोटो मी फेसबुक, ट्विटर व व्हॉट्सएपवर टाकला होता जो प्रचंड व्हायरल झाला.

कंडक्टर मॅनेजमँट व गणितमध्ये तसा हुशार असतो. म्हणजे १२ स्टँडिंग लिहिलेल्या बसमध्ये तो ५० लोकांना भरतो. करोना काळातही तीच स्थिती आहे. कॅलकुलेटर नसताना कंडक्टर गणित करून पैसे परत देतात म्हणजे बघा. लहान मुलांना हाफ तिकेट असल्यामुळे कंडक्टर त्यांना बसमध्ये घेत नाहीत. कधी-कधी ड्राईव्हरला दया येते, पण कंडक्टर त्याला सांगतो," हाफ तिकेट तो, थांबू नको." एक कंडक्टर चिल्लर आणले नाही तर किरकिर करायचा. मग खूप लोक त्याला फसवून पैसे न देताच उतरत असत. समाजात खूप ठिकाणी मुलींवर अन्याय होतो, पण बसमध्ये मुलांवर होतो. कंडक्टर मुलींशी चांगले वागतात व मुलांवर रागावतात. रेसिंग करण्यात ड्राईव्हरला प्रेरणा कंडक्टरच देतो. मग ड्राईव्हर पण असा ब्रेक लावतो की माईकल जॅक्सनचे फॉरव्हर्ड लीन प्रत्येक जण करतो. तसा गर्दीत मूनवॉक पण करावे लागते.

Change cannot be given every time. You must only bring the change - हे कुणी महान आंदोलनकर्त्याचे डायलॉग नाहीत हो! हे वाक्य आहे कंडक्चरचे. चेंज म्हणजे बदल नाही, चिल्लर! तसा जीवनात नेहमी पुढे जाण्याची प्रेरणा कंडक्टरच देतो कारण तो रोज म्हणतो - "पुढे जा!" तसे कंडक्टरचे जीवन त्रासदायक व रिस्कीसुद्धा असते. एक कंडक्टर मला सांगत होता - "आमचे जीवन काय आहे? आज आहे उद्या नाही, कुठे अपघात वगैरे झाला तर?!" अशा या सर्व बहादुर बऱ्या-वाईट कंडक्टरना मनापासून सॅल्युट!