स्वखर्चाने डिजिटल मीटर बसवा; नंतर मिळणार ११,२३४ रुपये!

वाहतूक खात्याकडून अधिसूचना जारी

|
23rd September 2021, 01:09 Hrs
स्वखर्चाने डिजिटल मीटर बसवा; नंतर मिळणार ११,२३४ रुपये!

स्वखर्चाने डिजिटल मीटर बसवा; नंतर मिळणार ११,२३४ रुपये!
वाहतूक खात्याकडून अधिसूचना जारी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
प्रवासी टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्यासंदर्भात सरकारने निश्चित केलेल्या योजनेतील कलम ४ आणि ६ मध्ये बदल करून टॅक्सी मालकांनी स्वत:हून खर्च करून डिजिटल मीटर बसवून घ्यावेत. त्यानंतर त्यांना तत्काळ ११,२३४ रुपये सरकारकडून देण्याचे निश्चित केले आहे. वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी या संदर्भातील अधिसूचना बुधवारी जारी केली आहे.
टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यासंदर्भातील वाद राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गाजत होता. काही टॅक्सी मालकांनी प्रथम डिजिटल मीटरला विरोध दर्शवला होता. पण, सरकारने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ते डिजिटल मीटर बसविण्यास तयार झाले. पण, डिजिटल मीटरसह प्रिंटर, जीपीएस आणि पॅनिक बटन याचा खर्च मोठा असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर तोडगा काढून टॅक्सी मालकांनी स्वखर्चाने या सुविधा घ्याव्यात. त्या  बदल्यात त्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण, भाजपच्या काही मंत्री, आमदारांनी टॅक्सी मालकांच्या बाजूने पुढाकार घेत सरकारने त्यांना मोफत डिजिटल मीटर देण्याची मागणी केली होती. निवडणूक तोंडावर असताना टॅक्सी मालकांना जपण्यासाठी सरकारनेही त्यांना डिजिटल मीटरसह सर्वच गोष्टी मोफत देण्याचे जाहीर केले होते.
बुधवारी वाहतूक संचालक सातार्डेकर यांनी अधिसूचना जारी करीत, टॅक्सी मालकांनी प्रथम स्वखर्चाने डिजिटल मीटर, प्रिंटर, जीपीएस आणि पॅनिक बटन या सुविधा टॅक्सीमध्ये बसवाव्यात. त्यानंतर त्यांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे वाहतूक खात्यात जमा करावीत. या सुविधेबदल्यात सरकारकडून त्यांच्या बँक खात्यांत तत्काळ ११,२३४ रुपये जमा केले जातील, असे म्हटले आहे. आतापर्यंत ज्यांनी स्वत:हून डिजिटल मीटर बसवून घेतले आहेत. त्यांनाही सरकारकडून आर्थिक मोबदला दिला जाईल, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.