Goan Varta News Ad

पॉर्नप्रकरणी राज कुंद्राचा सर्व्हर पोलिसांकडून हस्तगत

|
22nd July 2021, 02:16 Hrs
पॉर्नप्रकरणी राज कुंद्राचा सर्व्हर पोलिसांकडून हस्तगत

पॉर्नप्रकरणी राज कुंद्राचा सर्व्हर पोलिसांकडून हस्तगत
मुंबई:
पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अ‍ॅप आणि दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक कंटेंट अपलोड करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. आयटी तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस  सर्व्हरमधून माहिती बाहेर काढणार आहेत.
पोलिसांच्या हाती लागलेल्या या सर्व्हरमधून कुंद्रा यांची पूर्ण पोलखोल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्याचे फोनही जप्त केले आहेत. तसेच हे फोन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. राज कुंद्रा याची पोलखोल करण्यासाठी फोन आणि सर्व्हर या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचंही सांगितले जात आहे.
राज कुंद्राच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने चारच लोकांचा एक व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये मॉडल्सना द्यावयाचे पैसे आणि या धंद्यातून मिळालेला पैसा याबाबत चर्चा केली जात होती.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी इंग्लंडमध्ये राहतात. त्यांची केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनीदेखील आहे. या कंपनीचे प्रकाश बक्षी अध्यक्ष, तर राज कुंद्रा भागीदार आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाउसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक साहाय्य देत असल्याचा आरोप आहे.
----------
काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.
----------------