चिखली युथ फार्मर्स क्लबची पत्रकार परिषदेद्वारे मागणी
फोटो : चिखली येथे जमलेले चिखली युथ फार्मर्स क्लबचे तसेच गोव्यातील इतर ठिकाणचे युवक. (अक्षंदा राणे)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
वास्को : गोव्याचा विध्वंस करणारे रेल्वे दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण, ४०० केव्ही ट्रान्समिशन लाईन हे तीन प्रकल्प गोवा सरकारने त्वरित रद्द करावेत, अशी मागणी चिखली युथ फार्मर्स क्लबच्या युवकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
नियोला परेरा हिने सागरमाला प्रकल्प कोळसा वाहतुकीला लाभदायक ठरणार असल्याचा दावा केला. ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात येणारा कोळसा महाराष्ट्र, कर्नाटक येथून सागरमाला अतर्गत गोव्यात आणला जाईल, अशी भीती तिने व्यक्त केली. रेल्वे दुपदरीकरणाची गोव्याला गरज आहे काय? गोव्यातील पोलिसांवर विश्वास नसल्याने सरकारने गोव्याबाहेरील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणले काय, असे सवालही तिने उपस्थित केले. दुपरीकरणासाठी भूसंपादन करण्याचे काम बंद करा, अशी मागणीही तिने केली.
माविन परेरा याने प्रकल्पांना विरोध करण्यासाठी ५३ गावांतील सहाशेपेक्षा अधिक युवक एकत्र आल्याचे सांगितले. मंत्री गुदिन्हो यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी आंदोलन सुरू ठेवले तर गुन्हे दाखल होतील. सरकारी नोकर्या मिळणार नाही, पासपोर्ट तयार करता येणार नसल्याने विदेशी जाता येणार नाही, असे सांगितले. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवा. यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते, असे परेरा यांनी सांगितले. कोंचिता मोन्तेरो, व्हेलरी आफोन्सो यांनीही समयोचित विचार मांडले.