स्वत:चे दु:ख विसरून इतरांना दाखवला मार्ग

कर्मनिष्ठांची मांदियाळी

Story: संजय ढवळीकर |
11th October 2020, 11:33 am
स्वत:चे दु:ख विसरून इतरांना दाखवला मार्ग

‘‘एवढी ऊर्जा कुठून येते गं तुझ्यात? तुझ्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असूनही बँकेतून घरी परतताना मला पुरे होतं. घरी गेल्यानंतर काहीच करायला नको वाटतं. आणि तू बघ कशी, घरी जाऊन आवरून लगेचच निघाली ध्यानधारणेचा वर्ग घ्यायला. एवढं असूनही नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी घरचं काम पूर्ण करून माझ्या आधीच पोहाचतेस बँकेत...’’

शिवानीकडे एवढी ऊर्जा येते कोठून हा प्रश्न तिची मैत्रीण आणि बँकेतील सहकारी अनुपमाला दररोज पडलेला असायचा. शिवानीच्याच सांगण्यावरून अनुपमा बँकेचे काम संपवून त्या दिवशी आपल्या मैत्रिणीबरोबर निघाली होती ध्यानधारणेच्या वर्गाला. सोमवार ते शुक्रवार असे आठवड्यातील पाच दिवस शिवानी बँकेचे काम आटोपून संध्याकाळी घरी जात पटकन आवरून घ्यायची आणि सात ते आठ असा एक तासाचा ध्यानधारणेचा म्हणजेच मेडिटेशनचा वर्ग घ्यायची. साडेआठच्या सुमारास घरी पोहोचताच जेवायचा कार्यक्रम. कॉलेजमध्ये जाणारा मुलगा आणि नुकतीच नोकरीला लागलेली मुलगी यांनी जेवण गरम करून टेबलवर मांडून ठेवलेले असायचे.

जेवण होताच उद्याच्या तयारीला शिवानी लागायची. दोन्ही मुलांपैकी एक जण आलटून पालटून आईच्या मदतीला येत असत. दुसऱ्या दिवशी करायच्या स्वयंपाकाची सारी तयारी करून ती ठेवायची. कधी तरी सकाळी लवकर बँकेत जायचे असल्यास रात्रीच भाजी आणि आमटी तयार करायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी धावपळ कमी होते. बी.एस्सी.च्या अंतिम वर्षाला असलेला मुलगा सकाळी कॉलेजला जायचा. फॅशन डिझायनिंगमधील पदवी मिळवून नुकतीच नोकरीला लागलेली मुलगी आपल्या भावाप्रमाणेच दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जायची ती थेट संध्याकाळी घरी परतायची. शिवानीही बँकेत जेवणाचा डबा न्यायची. त्यामुळे दुपारचा वेळ वाचतो आ​णि बँकेचे कामही लवकर संपवून वेळेत निघता येते. ध्यानधारणेचा वर्ग तीच घेत असल्यामुळे सर्वांच्या आधी तिथे पोहोचून पूर्वतयारी करावी लागायची.

शिवानीचा जीवनप्रवास आपोआपच दोन टप्प्यांत विभागला गेला. अकरावीत असतानाच सागरशी प्रेम जुळले. महाविद्यालयीन शिक्षण एका वर्गात बसून पूर्ण केल्यानंतर दोघांनाही पदवी मिळताच वेगवेगळ्या बँकांत नोकरी मिळाली. सागर अतिशय हुशार, त्याने बढत्या घेत करिअरवर लक्ष द्यायचे आणि शिवानीने बढतीऐवजी आहे त्या पदावर नोकरी करत घर सांभाळायचे असे दोघांचे आधीपासून ठरले होते. दोन मुले झाली तसा त्यांचा संसार बहरून आला. मुलगी कॉलेजमध्ये अणि मुलगा हायस्कूलमध्ये असताना दुर्दैवाने कसल्याशा आजाराचे निमित्त होऊन सागरने अचानक या जगाचा​ निरोप घेतला. शिवानी आणि तिच्या मुलांवर आकांत कोसळला. हळुवार फुललेल्या एका प्रेमकहाणीचा निष्ठूर अंत झाला.

‘‘देव परीक्षा घेतोय ना, घेऊंदे. डगमगायचं नाही. तुमचं शिक्षण पूर्ण होईल, जिद्दीने चांगलं शिकायचं आ​णि नोकरी मिळवून आपल्या पायावर उभं राहायचं. मी आहेच तुमच्या सोबत. बाबा आपल्यात नसले तरी ते बघताहेत तुमची प्रगती...’’ सागरच्या जाण्यानंतर शिवानीत आमूलाग्र बदल झाला होता. कुटुंबप्रमुख म्हणून स्वत:ला सावरण्याबरोबरच मुलांना धीर द्यायला ती लागली होती.

शिवानीला कॉलेजमधील जीवनापासून खेळांपासून अध्यात्मापर्यंत अनेक विषयांत रस होता. सागर तिची नेहमी थट्टा उडवायचा, ‘‘तुला ना शिवानी, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला नको. एकाचबरोबर अनेक विषयांना हात घालायचा शौकच आहे तुला. तू खरं तर बँकेत लागण्याऐवजी म​ल्टिटास्किंग फर्ममध्ये गेली असतीस तर बरं झालं असतं...’’

खरंच होतं ते, आणि शिवानीच्या त्या मल्टिटास्किंगच्या आवडीमुळेच ती सागरच्या पश्चात जीवनात स्वत: उभी राहू शकली, अध्यात्माच्या आधारे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून, विशेषत: घर सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ध्यानधारणेचा अभ्यासक्रम तिने शिकून घेतला. स्वत: ध्यानधारणा पद्धतशीररीत्या करून दोन वर्षांत तिने त्या विषयातील मार्गदर्शकाची परीक्षा दिली व स्वत: वर्ग घेण्यासाठी पात्र ठरली. घराशेजारच्या ओळखीतील एका बंगल्याच्या गच्चीवर मेडिटेशनचे वर्ग सुरू केले. हळुहळू महिला जमत गेल्या. पुढे एका सामाजिक संस्थेच्या हॉलमध्ये वर्ग नेले.

सागरला जाऊन सहा-सात वर्षे झाली. दर दिवशी त्याच्या आठवणीने व्याकूळ होणाऱ्या शिवानीने स्वत:ला ध्यानधारणेत गुंतवून घेतले. आपल्या दु:खात बुडून राहण्याऐवजी मुलांना धीर दिला. त्याचबरोबर अनेक महिलांच्या आयुष्यातील तणाव दूर करून त्यांना दोन घटका विरंगुळा देण्यात मोलाची भूमिका ती बजावते आहे!