रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे करोनामुळे निधन

बेळगावचे खासदार; कुटुंबीय, हजारो हितचिंतक यांना मोठा धक्का


23rd September 2020, 10:26 pm
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे करोनामुळे निधन

नवी दिल्ली : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (६५) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा अहवाल कोविड-१९ पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या पत्नी मंगल आणि त्यांच्या दोन कन्या यांना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. सुरेश अंगडी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा निवडून आले होते. त्यांना दोन दिवसांनंतर डिस्चार्ज दिला जाईल, असे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांची आतुरतेने वाट पहाणारे त्यांचे कुटुंबीय आणि हजारो हितचिंतक यांना त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अंगडी कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही मंत्री नाईक यांनी केली आहे. 


हेही वाचा