पार्सेत तरुणाच्या आत्महत्येवरून तणाव

- काही युवकांविरोधात पोलिसांत तक्रार : प्रकरणाला ड्रग्जची किनार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th September 2020, 09:32 pm
पार्सेत तरुणाच्या आत्महत्येवरून तणाव

पेडणे : पार्से येथील गुरुदास पार्सेकर (वय ४०) या तरुणाने बुधवारी पणजी येथील अटल सेतूवरून मांडवीच्या पात्रात ऊडी घेऊन आत्महत्या केली. या तरुणाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृतदेह घरापर्यंत नेण्यास गावातील एका गटाने विरोध केला; तर मृत गुरुदास यांचे भाऊ रजनीकांत पार्सेकर यांनी पेडणे पोलिसांत तक्रार देत, या आत्महत्येला गावातील काही युवक जबाबदार आहेत, असा दावा केलाय. त्या संदर्भात काही जणांची नावे देण्यात आली असून, त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे गावात वातावरण तंग झाले आहे. या प्रकरणाला ड्रग्ज कारवाईची किनार असल्याचेही बोलले जात आहे. 

 याबाबत अधिक माहिती कशी की, काही दिवसांपूर्वी पेडणे येथील पोलिस उपनिरीक्षकांनी आपल्या टीमसह ड्रग्ज प्रकरणी पार्से भागातील काही जणांच्या घरावर छापा टाकला होता. त्यात दोघांना ताब्यात घेतले होते. तथापि, याबाबत पोलिस स्थानकावर त्याची नोंद नाही. दरम्यान, त्यानंतर संबंधितांना सोडून देण्यात आले होते. त्यापैकी एकाने गुरुदास पार्सेकर यांच्यावर ‘तुच आमची तक्रार दिलीस’, असा आरोप करत शिवीगाळ केली होती. त्याच व्यक्तीने गुुरुवारी काही पत्रकारांसमोरही आपण ड्रग्ज घेतो, अशी जाहीर वाच्यता केलीय. दरम्यान, या पार्श्वभूमीचा गुरुदास पार्सेकर यांच्या आत्महत्येशी संबंध असल्याचा दावा त्यांचे भाऊ रजनीकांत यांनी पोलिस तक्रारीत केला आहे. 

गुरुदास यांनी १६ रोजी आत्महत्या केली. त्यानंतर १७ रोजी शवविच्छेदन झाले. त्याअंती ती व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी मृतदेह गावात आणण्यास हरकत घेतली होती. मात्र, नंतर स्थानिक स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दीपक कलंगुटकर यांची सखोल तपासाची मागणी

पार्सेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर यांनी पत्रकारांशी बोलताना काही मुद्यांना स्पर्श केला. ते म्हणाले, या भागातील काही तरुण हे व्यसनाधीन होत आहेत. त्यामागील कारणांचा मागोवा घेऊन सामाजिक जागृती होणे आवश्यक आहे. ड्रग्ज प्रकरणी छापे टाकून पोलिस जर राजकीय पुढार्‍यांच्या दबावाखाली येऊन कोणाला सोडत असतील तर ती बाब योग्य नव्हे. तसेच पोलिसांची छापा प्रक्रिया अनेकांना संशयास्पद वाटली. त्याची कारणेही विचारात घेण्यासारखी आहेत. आत्महत्या केलेल्या तरुणावर कुणाचा दबाव होता का, याचा आता निष्पक्ष तपास झाला पाहिजे.

हेही वाचा