- केंद्राच्या परवानगीशिवाय प्रशासकीय मंजुरी - तब्बल ८८५.५० कोटींच्या अनुदानाला मान्यता - गोव्यासाठी धोक्याची घंटा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कणकुंबी येथील कळसा आणि नेरसे येथील भांडुरा नाला प्रकल्प मार्गी लावण्यास कर्नाटक सरकारने तत्वत: प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यासाठी तब्बल ८८५.५० कोटींच्या अनुदानाला मान्यता देण्यात आली आहे. केंद्राकडे या दोन्ही प्रकल्पांचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजुरीविना रखडला असताना कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरणार असून, तो गोव्यासाठी मोठा धक्का ठरणार आहे.
म्हादई जलतंटा लवादाने कळसा नाल्यातून १.७२ टीएमसी, तर भांडुरा नाल्यातून २.१८ टीएमसी पाणी मलप्रभेत वळविण्यास संमती दर्शविली आहे. त्यासाठी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याचे आवश्यक परवाने घेण्याबरोबरच नव्याने विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याची सूचना कर्नाटक सरकारला करण्यात आली होती. त्यानुसार अलिकडेच कर्नाटक सरकारने केंद्राला अहवाल सादर केला होता. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसताना मंगळवारी मंत्रिमंडळाने तत्वत: प्रशासकीय मंजुरी देऊन कोणत्याही स्थितीत प्रकल्पांच्या अंमलबजावणीस सुरुवात केली जाईल, असा संदेश दिला आहे. ८८५.५० कोटींचा निधी मंजूर करून निविदा काढण्यापूर्वी अर्थ खात्याकडून मंजुरी घेण्याची सूचना आदेशपत्रात करण्यात आली आहे. यावरून केंद्राकडून कर्नाटकची पाठराखण केली जाईल, असा विश्वास कर्नाटक सरकारला असावा. तसे झाल्यास गोव्यासाठी हे धोक्याचे वळण ठरेल.